Maharashtra Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. या निकालात बंडखोर आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. महाराष्ट्रातही तेच घडण्याची शक्यता आहे
हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आहेत. बहुमतासाठी ४६ जागांची गरज असताना भाजपनं ४८ जागांवर बाजी मारली. तर काँग्रेसनं ३७ जागा जिंकल्या. भाजपनं काँग्रेस उमेदवारांचा पराभव करुन जिंकलेल्या १४ जागांवरील मताधिक्क्य अतिशय कमी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांमुळे, त्यांना घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचे उमेदवार १४ जागांवर अगदी कमी फरकानं पराभूत झाले. अपक्ष आणि बंडखोर नसते किंवा त्यांची संख्या कमी असती, तर हरियाणा निवडणूक काँग्रेसनं जिंकली असती.
हरियाणात काँग्रेस आणि भाजपला मिळालेल्या मतांमध्ये केवळ १ टक्क्याचं अंतर आहे. पण या १ टक्क्यामुळे भाजपनं काँग्रेसपेक्षा अधिकच्या ११ जागा जिंकल्या. बंडखोर, अपक्षांनी काँग्रेसच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली. अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांना जागा जिंकण्यात यश आलं नसलं तरीही त्यांनी काँग्रेसचं नुकसान केलं.
महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये निवडणूक अर्ज भरणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०१९ मध्ये ५ हजार ५४३ जणांनी अर्ज भरला होता. आता हा आकडा १० हजार ९०५ वर गेलेला आहे. यावरुन अपक्ष आणि बंडखोरांची संख्या किती आहे याचा अंदाज बांधता येईल.
एकट्या भाजपचे १९ बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बंडखोरांचा, अपक्षांचा आकडा ५० ते १०० च्या दरम्यान जातो. हा आकडा मोठा असल्यानं बंडखोर मंडळी अनेकांचा कार्यक्रम करणार असल्याचं दिसत आहे.
राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेली फूट, त्यामुळे पक्षांची वाढलेली संख्या बंडखोरीस कारणीभूत असल्याचं निरीक्षण सीएसडीएसचे सहसंचालक संजय कुमार यांनी नोंदवलं. ‘जेव्हा दोन आघाड्या तयार होतात. दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन पक्ष असतात. त्यावेळी इच्छुकांची संख्या वाढते. सगळ्यांना तिकीट देणं शक्य नसल्यानं बंडखोरी वाढते,’ असं संजय कुमार म्हणाले.