Ajit Pawar Criticize MVA Leaders: काल कोल्हापूर नगरीत जे अपमानास्पद घडलं आहे. आज त्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आयोजित सभेत अजित पवारांनी सद्य परिस्थितीवर भाष्य केले असून कोल्हापूरकरांना मतदानासाठी सादही घातली आहे. ‘महायुतीने कोल्हापुरात सर्व ठिकाणी तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहिलेल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कोल्हापूरकरांसाठी हवं ते करण्याचा प्रयत्न केला,’ असे अजित पवार म्हणाले.
‘तेव्हा सत्तेची मस्ती आणि आता विरोधी पक्षात असतानाही…’ कोल्हापुरातील राजकीय नाट्यावरुन अजित पवारांचा घणाघात
यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल कौतुकौद्गाही काढले आहेत. ते म्हणाले, ‘विरोधकांनी संविधान बदलाचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली आहे. आता तिच्या हातात संविधान देण्यात आले आहे. विरोधकांचे नॅरेटिव्ह धादांत खोटे आहेत. शेतकरी बांधवांच्या ऊसावर खूप मोठा इन्कम टॅक्स होता, तो कमी होण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले पण एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यास तो नफा समजण्यात येऊ नये, असा मोठा निर्णय केवळ पंतप्रधान मोदींनी घेतला. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या डोक्यावरील टांगती तलवार हटली.’
यासोबतच ‘सुशील कुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात यांनी शेतकऱ्यांना झिरोचे बिल देण्याचा निर्णय घेतला पण पुन्हा सत्तेत येतात ते रद्द केले. पण आता आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन आहे की योजना चालू ठेवायच्या असतील तर महायुतीला मतदान करा, अशा शब्दांत शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांबाबत पुन्हा इतिहास गिरवला असून शेतकऱ्यांना मतदानाचे आवाहन केले आहे.
आजकाल बरीच वक्तव्य चाललेली आहे. हे चोरलं आणि ते चोरलं. पण कुठली चोराचोरी झालेली नाही. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. निवडणूक आयोगानेही तसे अनुकूल निर्णय घेतले आहेत, असे म्हणत विरोधकांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.