Ratnakar Gutte on Vidhan Kadam: आचारसंहितेपूर्वी पूर्णा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळेस या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनी जाऊ नये म्हणून विशाल कदम यांनी दमदाटी केली होती, असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे.
रत्नाकर गुट्टे यांनी आपले प्रतिस्पर्धी मविआचे उमेदवार विशाल कदम यांना त्यांच्याच होमग्राउंडवर जाऊन थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासोबतच ‘२०१९च्या विधानसभा निवडणुकीत विशाल कदम तुम्ही पराभूत झाला त्यानंतर या पाच वर्षात तुम्ही काय विकास कामे केली हे एकदा सांगाच,’ असा सवालही गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पूर्णा शहरात आज राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात पूर्णा शहरातील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बंटी कदम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी रत्नाकर गुट्टे मित्र मंडळामध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमात बोलताना रत्नाकर गुट्टे यांनी विरोधी उमेदवार विशाल कदम यांच्यासह खासदार संजय जाधव यांना लक्ष्य केले आहे.
पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे म्हणाले की, पूर्णा तालुक्याचा विकास मागील पंचवीस वर्षात कधीच झालेला नाही. पूर्णा शहर असो की तालुका असो, हा आतापर्यंत शिवसेना या पक्षाच्या पाठीशी राहिला. पण ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर सत्ता भोगली त्यांनी मात्र पूर्णा शहरासह तालुक्यांमध्ये काहीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे पूर्णा शहर भकास झाले होते. पण मागच्या अडीच वर्षाच्या काळात मी पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास १६०० कोटी रुपयांची विकासकामे करू शकलो. असे
रत्नाकर गुट्टे पुढे म्हणाले, २०१९ मध्ये पूर्णा तालुक्यात मला १६ हजार मते पडली होती. एवढी कमी मते पडली असली तरी मी सोळाशे कोटी रुपयांचा विकासनिधी या तालुक्यात आणू शकलो. मी कधीच भेदभाव केला नाही, गंगाखेड, पालम, पूर्णा या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी बोलताना रत्नाकर गुट्टे यांनी खासदार संजय जाधव यांचा विधानांचा देखील समाचार घेतला. गंगाखेड येथे जाहीर सभेत खासदार संजय जाधव यांनी माझ्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. मी सर्वसामान्यांच्या जमिनी खाल्ल्या असे देखील आरोप केले पण हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत उलट खासदार संजय जाधव यांनी आपल्याच कार्यकर्त्यांच्या जमिनी नावावर करून घेतल्या खासदार संजय जाधव यांना देवस्थानच्या जमिनीही कमी पाडल्या. कारखान्याच्या नावावर कर्ज उचलून शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले, असा गंभीर आरोप करत ‘शेतकऱ्यांचे सिबिल कसे मिळवून द्यायचे यासाठी मीच प्रयत्न करत आहे,’ असे रत्नाकर गुट्टे म्हणाले.
जातीपातीच्या नावावर निवडणूक लढण्यापेक्षा…
सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार जातीपातीच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच नसल्यामुळे जातीचा आधार घेतला जात आहे पण मी मागच्या पाच वर्षांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात कधीच जात-पात पाहिली नाही तिन्ही तालुक्यांमध्ये भरघोस असा निधी आणून दिला मराठा समाज असो, मुस्लिम असो की दलित समाजासो या तीनही समाजाचे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामुळे विरोधकांनी आमना सामना करायचा असेल तर समोरासमोर बसून विकासावर चर्चा करावी पाठीमागे जातीपातीच्या नावावर निवडणुकीचा अजेंडा चालू नये, असे देखील रत्नाकर गुट्टे म्हणाले.