Sharad Pawar Aggressive Sugar Factory : शरद पवार युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ बारामतीमधील सभेत बोलत होते. त्यावेळी ते पहिल्यांदाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. साखर कारखान्यातील कामगारांना दम दिल्यावरुन त्यांनी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाला इशारा दिला आहे.
कामगारांना दम दिला जात असेल, तर…
तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून कारखान्यातील सभासद आणि कामगारांना दम दिला जात असल्याचे सांगत पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांच्या हितासाठी मी अनेकदा मदत केली आहे. मी कधीही त्यांची जात बघत नाही, माझी जात शेतकरी आहे. कुठलाही साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर मी पक्ष बघितला नाही, सरसकट मदत केली. तुमच्या सभासदांना, कामगारांना दम दिला जात आहे, असे प्रकार घडल्यास मला कळवा. मी त्यांच्या घरीच जातो. लोकशाहीमध्ये मत देण्याचा अधिकार सर्वांना आहे.
कोणालाही दम दिलेला सहन केला जाणार नाही – शरद पवार
एका चेअरमनने कामगाराला नोकरीवरुन काढून टाकतो असे सांगितल्यानंतर मी थेट त्यांना फोन केला. कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. कोणाला दम दिला, तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा पवार यांनी सोमेश्वरनगर येथे झालेल्या सभेत दिला. मला त्या रस्त्याने जायचे नाही, माणसं आपली आहेत. माणसं चुकली असतील, तर बाबांनो आपण कधी असं वागू नका, असा सल्लाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा सोमेश्वरनगर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
… म्हणून मी शेती मंत्रालय घेतलं
सर्व निवडणुका तुम्ही लोकांनी हातात घेतल्याने काम करण्याची संधी मिळाली, त्याचा पाया बारामतीकरांनी घातला होता, असं कौतुक शरद पवार यांनी केलं. तुमच्या आई वाड-वडिलांनी मनापासून साथ दिली. २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी घरी आले. त्यांनी मला संरक्षण, गृह, अर्थ खाते घेण्याची विनंती केली, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी शेती मंत्रालय घेतलं असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी काम केलं. वीज तयार करण्यासाठी मी सांगितलं आणि त्यांना लागणाऱ्या परवानगी आणि आर्थिक मदत केली असल्याचं पवार यांनी सांगितलं. कारखानदारी उभारली, उद्योगधंदे उभारणीस बळ दिलं, शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी विविध शिक्षण संस्था उभ्या केल्या असल्याचंही पवार यांनी सभेत बोलताना सांगितलं.