Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange Patil: ‘मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांपुढे सर्वसामान्य रयतेतील मराठ्यांचा बळी दिला,’ अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’चा ‘जोशाबा’ (जोतिबा, शाहू, आंबेडकर) जाहीरनामा प्रसिद्ध करताना आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. ‘विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यावर जरांगे यांची भूमिका संपली असल्याचे आम्ही मानत नाही. काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेने ७० टक्के जागांवर इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) श्रीमंतांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजाचे मतदान एकतर्फी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ओबीसी व अनुसूचित जाती-जमाती वंचितच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत,’ असे दावेही आंबेडकर यांनी केले. ‘मनोज जरांगे यांनी काकाला मत दिले काय किंवा पुतण्याला दिले काय, सत्ता कुटुंबातच राहील. त्यांचे उंबरठे झिजविणारा समूह संपल्यावरच घराणेशाहीच्या सत्तेला आव्हान निर्माण होईल,’ असेही ते म्हणाले.
सत्तेत सहभागी होणार
‘वंचितचे पंधरा आमदार निवडून आले, तरी सत्तेत आम्ही सहभागी होऊ. त्यासाठी सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला आमच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करावी लागेल,’ असे आंबेडकर म्हणाले.
काय आहे वंचितचा जाहीरनामा
- शेतमालाला रास्त हमीभाव नसल्याने मराठा आरक्षणाची मागणी. कृषी खर्च आणि किमत आयोगातर्फे शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यावर त्याची काटेकोर अंमलबजावणी व्यापाऱ्यांना बंधनकारक, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करणार.
- सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव, तसेच कापूस व सोयाबीनच्या निर्यातीतून मिळणाऱ्या परकीय चलनाच्या कमिशनपोटी प्रत्येक शेतकऱ्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस देणार.
- धर्माच्या नावाने दंगली व सर्वधर्मीयांच्या दैवतांची विटंबना हा गुन्हा ठरवून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणार.
- राज्यात दोन लाख सरकारी, निमसरकारी रोजगार निर्मितीसाठी योजना राबविणार.
- तेलंगणातील योजनेच्या धर्तीवर अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विकसनासाठी अनुदान देणार.
ऊस व साखर कारखान्यांचे नेतृत्व आता शेतातील बुजगावणे झाले असून, त्यांच्या नेतृत्वाला आता धार राहिलेली नाही. नव्या व्यवस्थेत नवीन नेतृत्वाची गरज आहे. गुजरात हे चोरांचे राज्य असून, देशाला लुटत आहे. महाराष्ट्राला कधीही केंद्राची गरज भासलेली नाही. ती ताकद पुन्हा प्रस्थापित करू, असा घुमजाव प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.