Deepak Kesarkar Commented on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या पहिल्या प्रचार सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर तोफ डागली होती. यावर आता शिवसेना नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मशालीपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंना जास्त मते मिळाली आहेत. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. तर, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही.
‘सावरकरांचा ज्यावेळी अपमान झाला, त्यावेळी बाळासाहेबांनी जोडो मारो आंदोलन सुरु केले होते. ते मंत्री मुंबईत पाऊल नाही टाकू शकले नाही, ही बाळासाहेबांची ताकद होती.’ असे नमूद करत दीपक केसरकर पुढे म्हणाले, सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी काहीही बोलावे आणि आमच्या युवराजांनी त्यांना मिठी मारावी, हे चित्र सुद्धा आमच्या जनतेने पाहिले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले ?
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे.’ असे राज ठाकरेंनी ठासून सांगितले. तर त्यांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांनाही लक्ष्य केले. ‘तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचंय करा, शरद पवारांसोबत माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचंच अपत्य आहे, ते अजित पवाराचं अपत्य नाही, असे राज ठाकरेंनी अधोरेखित केले.
दरम्यान राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरन उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र डागले. ‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो असायचा पण हिंदूह्रदयसम्राट हे नाव नसायचं. दरम्यान मी काही उर्दू होर्डिंग्जही पाहिले, ज्यावर उर्दू भाषेत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर जनाब लिहिलेले असायचे’ असे राज ठाकरे म्हणाले.