Uddhav Thackeray sacked Rupesh Mhatre : बंड आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊनही रुपेश म्हात्रेंवर कारवाई का झाली, त्याचं कारण समोर आलं आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतूनही कल्याण पूर्व शहर अध्यक्ष महेश गायकवाड आणि माजी नगरसेवक विशाल पावशे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली होती. या ठिकाणी पक्षाचा आमदार असल्याने ही जागा देण्याचा आग्रह पक्षाने धरला होता. मात्र ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही राहिला होता. अखेर जागा वाटपात सपाला मतदारसंघ मिळाला आणि आमदार रईस शेख यांना उमेदवारी मिळाली.
Rupesh Mhatre : बंड मागे, तरी हकालपट्टी; वरुण-आदित्य यांच्यावरुन टीका जिव्हारी, उद्धव ठाकरेंचा तडक निर्णय
माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर पक्ष नेत्यांच्या विनंतीनंतर म्हात्रेंनी अपक्ष अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र तरीही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत दुसऱ्याच दिवशी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ठाकरेंवरील टीका भोवल्याची चर्चा
अर्ज मागे घेण्याच्या काही दिवस आधी रुपेश म्हात्रे यांनी शहरात एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. वांद्रे पूर्व आणि वरळी मतदारसंघात मदत व्हावी, यासाठी भिवंडीत समाजवादी पक्षाचा उमेदवार देण्यात आला. त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येक वेळी बळी देण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप म्हात्रेंनी केला होता. वांद्रे पूर्व येथून वरुण सरदेसाई, तर वरळीतून आदित्य ठाकरे रिंगणात आहेत.
आपल्याला पक्षाने भिवंडीच्या बाबतीत नेहमी सावत्र वागणूक दिली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे आणि आता उद्धव ठाकरे देखील तेच करत आहेत. कोणत्याही पक्षाने आम्हाला गृहित धरु नये, असे विधान त्यांनी त्यावेळी सभेत केले होते. आता हेच आरोप त्यांना भोवल्याची चर्चा शहरात सुरु आहे.