विनित जांगळे, ठाणे : प्रचाराची रणधुमाळी सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र खुद्द शिंदे कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यामधील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज उतरली आहे. घरोघरी जाऊन पत्रक वाटप, महायुती सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद व प्रचार फेरीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदारसंघात पदाधिकारी करतात. त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे राज्यात प्रचारात व्यस्त असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची ठाण्यातील मतदारसंघात गस्त सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केदार दिघे यांच्या सामन्याकडे पाहिले जाते. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यातच ही दुरंगी लढत रंगणार आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा एकनाथ शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले असून यंदा मोठ्या मताधिक्याने शिंदे यांना विजयश्री प्राप्त होण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा बोलबाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे माजी लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये या प्रचाराचा नारळ फोडून एकाचवेळी या प्रभागातील प्रचाराची सुरवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले – जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांना यंदा जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केल्याचे रेपाळे यांनी सांगितले. यासोबत या प्रभागातील आनंदनगर भागात शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी प्रचार पत्रके वाटून शिंदे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. तसेच माजी नगरसेविका मीनल संख्ये, नम्रता फाटक व राजू फाटक यांनीही शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत मतदारसंघात घरोघरी जात प्रचारपञकांचे वाटप केले.
Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात खदखद
‘लाडका भाऊ’ टॅगलाईन जोरात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यश पाहता शिंदे यांचे प्रचार पत्रकाचे वाटप करताना महिला वर्गाला आपल्या लाडक्या भावाला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले जाते. त्यामुळे शिंदे यांच्या प्रचारात लाडक्या भावाची टॅगलाईन गाजत असल्याचे दिसून आले. दरम्यान, शिंदे यांच्या मतदारसंघातील किसनगर भागातही ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरु असून रॅलीचेही नियोजन सुरु असल्याचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी सांगितले.
सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’च, मतदारांना भावनिक आवाहन
गेल्या दोन-सव्वा दोन वर्षांत विक्रमी वेगानं काम झालं. अनेक क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकवर जाऊन पोहोचला. विकासकामांसोबत असंख्य लोककल्याणाच्या योजना आवर्जुन राबवल्या, असे शिंदे यांच्या प्रचार पत्रकात नमूद केले आहे. सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच तर माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. मी आजही स्वतःला ‘सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही. तर सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’च समजतो, असे भावनिक आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.