Uday Samant On Uddhav Thackeray : रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेनंतर उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे.
राजकारण किती चांगल्या पद्धतीने करता येतं हे दाखवणारे काही महाराष्ट्रातील नेते आहेत आणि राजकारण किती घाणेरड्या पद्धतीने भाषण करुन दाखवता येतं, हे उबाठाच्या झालेल्या कॉर्नर सभेत पाहायला मिळालं. पण माझ्यावर अशा कितीही कॉर्नर सभा घेऊन टीका करा, त्याचा बदला रत्नागिरीकर घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याचं उत्तर तुम्हाला २३ नोव्हेंबर रोजीच मिळेल, असा इशारा उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उबाठाच्या सभेमुळे माझं मताधिक्य दीड लाख
माझ्यावर ज्या ज्या वेळेला टीका होते, त्या वेळेला मताधिक्य वाढते, हा अनुभव आहे आणि उबाठाच्या पक्षप्रमुखांच्या कॉर्नर सभेने आता माझं मताधिक्य देखील सव्वा लाख होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहेच, पण आता ते दीड लाखापर्यंत रत्नागिरीकर नेतील आणि हे तुम्हाला २३ तारखेला कळेल, असा इशारा त्यांनी दिला.
देशातील पहिला मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीत
३० हजार कोटींचा, ३० हजार जणांना रोजगार देणारा मोठा प्रोजेक्ट रत्नागिरी येथे उभा राहतो आहे. मी अभिमानाने सांगतो रत्नागिरीवासियांना ३० हजार कोटी रुपयांचा, तब्बल ३० हजार मुला-मुलींना रोजगार देणारा देशातील पहिला सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत चंपक मैदानाजवळ, हा प्रोजेक्ट साडेसातशे एकरमध्ये उभा राहतोय. त्यामुळे आता येथील मुला-मुलींना बाहेर नोकरीसाठी मुंबईला जावं लागणार नाही.
आपल्याला चाकरमानी हा शब्द बंद करायचा आहे. चाकरमानी यांना तिकडे जाऊ दे, चांगल्या प्रकारची मोठ्या पगाराची नोकरी करू दे, पण रत्नागिरी येथील मुलं-मुली येथेच गावी राहून नोकरी करतील, त्यांना आपल्या आजी-आजोबांची, आई-वडिलांची सेवा करू दे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देशातला हा मोठा प्रोजेक्ट रत्नागिरी येथे आणण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती नेवरे येथील सभेत बोलताना उदय सामंत यांनी दिली. पण हे काही लोकांना माहिती नसतं, त्यांच्या हातात टीका करण्यापलीकडे काहीच नसतं, असंही सामंत यांनी सुनावलं आहे.
इतकी घाणेरडी टीका करणारा नेता पाहिला नव्हता
ठाकरे यांनी मी आणि माझे बंधू किरण सामंत आम्हा दोघांवर तसंच नारायण राणे यांच्यावरही घाणेरडी टीका केली. एखाद्याची बदनामी करायची इतकंच त्यांना जमतं. मी गेली २५ वर्ष राजकारणात आहे, अनेक मुख्यमंत्री, नेते आजवर बघितले, अनेक संवेदनशील नेतेही बघितले, पण आपल्या समोरच्या विरोधी उमेदवारावर त्याच्या मतदारसंघात जाऊन इतक्या खालच्या पातळीवर बदनामीकारक टीका करायची, असा नेता मी कधी पाहिला नाही, असं उदय सामंत म्हणाले.
मी सामान्य कुटुंबातून आलो हे त्यांना दुःख
मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. माझे वडील आमदार खासदार पक्षप्रमुख नव्हते. मी सामान्य घरातून आलेलो आहे आणि हेच दुःख उद्धव ठाकरे यांना आहे आणि म्हणूनच ते टीका करत सुटले आहेत. पण त्याचं उत्तर त्यांना २३ तारखेला कळेल, असंही सामंत म्हणाले.
Uday Samant : ठाकरेंचा अभ्यास कच्चा; बारसू रिफायनरी बाबत दुटप्पी भूमिका, उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका
बारसू रिफायनरी जन्माला ठाकरेंनीच घातली, उबाठाकडून गैरसमज पसरवण्याचे उद्योग
ठाकरेंची दुटप्पी भूमिका आता कोकणवासीयांच्या लक्षात आली आहे. बारसू रिफायनरी त्यांनी आणली, त्याला जन्म त्यांनीच दिला. आता निवडणूक आली की सांगतात, आम्ही रिफायनरी रद्द करू, हे गैरसमज ते पसरवत आहेत. इतकंच नाही तर त्यांचे माजी खासदार विरोध करत आहेत, त्यांच्या राजापूरच्या उमेदवारालाच रिफायनरी हवी आहे, ही यांची दुटप्पी भूमिका आता कोकणाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे रद्द केली तर आता आम्ही रद्द करणार आणि आणली तर आम्ही आणली असं खोटं पसरवण्याचा उद्योग ते करत आहेत आणि उबाठाच्या गैरसमज पसरवण्याच्या या कारस्थानांना आता कोणीही बळी पडणार नाही, असं म्हणत सामंत यांनी टीका केली आहे.