Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची सभा मुंबईत होत आहे. या सभेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हजर असणार आहेत. त्यांचं भाषणही होणार आहे.
महाविकास आघाडीच्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी व्यासपीठावर कलाकारांच्या एका संचानं विविध गाणी सादर केली. यामध्ये जयोस्तुते गाण्याचाही समावेश होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उपस्थितांनी कान टवकारले. जयोस्तुते गाणं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कायम टीका करत असतात. सावरकर यांना ब्रिटिशांकडे पेन्शन मिळायची. त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, याचा उल्लेख ते सातत्यानं करतात. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते त्यांना लक्ष्य करतात. राहुल गांधींच्या सावरकर यांच्या विरोधातील विधानांमुळे अनेकदा वाद उफाळून आला. भाजपनं त्यांच्याविरोधात आंदोलनं केली आहेत. विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे राहुल यांना अनेकदा न्यायालयाची पायरीदेखील चढावी लागलेली आहे.
बीकेसीतील सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. याच सभेत सुरुवातीला कलाकारांनी जयोस्तुते गाणं सादर केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्य सभेच्या व्यासपीठावर जयोस्तुते गाणं सादर झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता यावर महाविकास आघाडीकडून अद्याप तरी कोणत्याही नेत्यानं भाष्य केलेलं नाही.
बीकेसीतील सभेतून महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. याच सभेतून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीचा आपला जाहीरनामा सादर करेल. या जाहीरनाम्यात पाच गॅरंटींचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्यात आरोग्य, नोकर भरती, कर्ज माफी, महिलांना आर्थिक मदत याबद्दलच्या घोषणा केल्या जाऊ शकतात. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा अजेंडा मविआकडून सेट केला जाऊ शकतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून गॅरंटी देण्यात आलेल्या होत्या. त्याच जोरावर त्यांनी सत्ता आणली.