Amit Deshmukh in Pathri : महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर शेतीमालाला आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायदा केला जाईल, असं वक्तव्य काँग्रेस नेत्याने करत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढत असलेल्या आमदार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारार्थ सोनपेठ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे आणि शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे प्रश्न सोडवणार असल्याची घोषणा यावेळी अमित देशमुख यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यामध्ये बरेच मुख्यमंत्री होऊन गेले यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख ते अशोक चव्हाणांपर्यंत मुख्यमंत्री झाले, पण कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आपली गरीमा ढसाळू दिली नाही. पण हे महायुतीचे सरकार आणि त्या सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री यांनी मात्र महाराष्ट्राची प्रतिमाच मलीन केली आहे. सर्वसामान्यांसाठी केंद्राकडून येणारा पैसाच या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार गद्दारांचे होते. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपने या गद्दारांना आपल्यामध्ये सामावून घेतले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या महायुतीच्या सरकार विषयी प्रचंड चीड आहे, त्यामुळेच आता २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचेही आम्ही देशमुख यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांसाठी महिन्यात तीन हजार रुपयांचे मानधन सुरू करण्यात येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल, शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे यासाठी एक वेगळा आयोग नियुक्त करण्यात येईल आणि त्या आयोगाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले.
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांचा विरोध
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात आली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सकारात्मकता दर्शवली होती, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विरोध केला होता, त्यामुळे ज्या नेत्याने परभणीच्या विकासाला विरोध केला त्याच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार का? असा सवालही माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
पाथरी मतदारसंघातील सर्वच देशमुख सुरेश वरपूडकर यांच्या पाठीशी
पाथरी मतदारसंघात आमचे मोठ्या प्रमाणावर पाहुणे आहेत सध्या राज्यात सगळ्या सोयऱ्याचे राजकारण चालत आहे त्यामुळे पाथरी मतदारसंघातील सर्वच देशमुख सुरेश वरपूडकर यांच्या पाठीशी असल्याचे अमित देशमुख म्हणाले. जे देशमुख त्यांच्या पाठीशी नाही, त्यांची नावे सांगा मी त्यांना सरळ करेन असेही अमित देशमुख म्हणाले. त्यामुळे सोनपेठच्या शेळगाव येथील लक्ष्मीकांत देशमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
बंडखोरी केलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राण यांनी माघार घ्यावी
पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या काही प्रतिनिधींनी बंडखोरी करत पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा आणि महाविकास आघाडीने जो काँग्रेसचा उमेदवार दिला आहे सुरेश वरपूडकर यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती अमित देशमुख यांनी केली आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि आपले प्रश्न येणाऱ्या काळात सामंजस्याने मिटू शकतात असेही ते म्हणाले.
Amit Deshmukh : Amit Deshmukh : मविआ सरकार येताच शेतमालाला आधारभूत किंमत देणारा कायदा करणार, अमित देशमुखांचं मोठं वक्तव्य
अमित देशमुख यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे आणि शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सक्षम असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश वरपूडकर हे निवडून आल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. त्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदार सुरेश वरपूडकर यांना निवडून देतील का हे पाहावे लागणार आहे.