Yogi Adityanath: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं. आज त्यांनी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
योगी आदित्यनाथ यांचं स्वागत करताना भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार हरिश पिंपळे यांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी योगींसाठी अनेक विशेषणं वापरली. ‘रामभक्त, कट्टर हिंदूवादी, आणि बुलडोझर बाबा म्हणून ज्यांनी नवीन ओळख निर्माण केलेली आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदिती योगीनाथजी यांचं मी स्वागत करतो, असं पिंपळे म्हणाले. योगी आदित्यनाथांना आदिती योगीनाथजी म्हटल्यानं पिंपळे यांनी लिंगबदल झाल्याची चर्चा सभास्थळी सुरु होती. भाजपच्या आमदाराला त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव माहीत नाही का, अशीही चर्चा परिसरात रंगली.
गेल्या काही वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी त्यांची प्रतिमा बुलडोझर बाबा अशी केली आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या सरकारकडून अनेकदा गंभीर आरोप असलेल्या आरोपींच्या घरांवर, त्यांच्या मालकीच्या मालमत्तांवर बुलडोझरनं तोडक कारवाई केली जाते. त्यामुळे ते देशभरात बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी पिंगळेंनी थेट बुलडोझरच मागवला होता. या बुलडोझरच्या बकेटमध्ये पिंगळे आणि योगी उभे राहिले. त्यांचा हा स्टंट पाहायला अनेकांनी गर्दी केली.
योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी बुलडोझर आणणारे, पण भाषणात त्यांचंच नाव चुकवणारे हरिश पिंपळे मूर्तीजापूरचे आमदार आहेत. ते सलग तीनवेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. २००९, २०१४, २०१९ मध्ये त्यांनी बाजी मारली. आता पक्षानं त्यांना चौथ्यांदा संधी दिली आहे. मागील निवडणूक पिंपळे यांना बरीच जड गेली. वंचितच्या उमेदवारानं त्यांना चांगली लढत दिली. अवघ्या १९१० मतांनी पिंपळे निवडून आले.