Bhimrao Dhonde sabha in Aashti Beed: लोकसभा निवडणुकीपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोराकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चूक झाली आहे. ही चूक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच त्यांची एकच धांदल उडाली होती.
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. आपल्याला संधी न मिळाल्याने माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि आता ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी आता प्रचाराचा शंख फुंकला आहे. यातच भीमराव धोंडे स्वत:च्या प्रचारासाठी आष्टीमध्ये जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी मात्र भीमराव धोंडेंची गल्लत झाली. मतदारांना आवाहन करताना ते स्वत:चेच चिन्ह विसरले आहेत आणि चक्क विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे तुतारी वाजवण्याचे मतदारांना आवाहन केले. ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच त्यांची धांदल उडाली. नंतर लागलीच त्यांनी आपल्या विधानाची सारवासारव केली.
राजकीय व्यासपीठावरुन त्यांनी अशाप्रकारे विधान केल्याने चर्चेने आता जोर धरला आहे. दरम्यान, भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. आष्टी मतदारसंघात त्यांना महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्यासमोर धोंडेंचे आवाहन असणार आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेहबूब शेख यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील मतदासंघात तिरंगी लढत होणार येथील राजकारणात वेगळीच रंगत चढणार आहे.