विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं ५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेतून पंचसुत्रीची घोषणा करण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २ कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला महायुती सरकार महिलांना बस प्रवासात ५० टक्क्यांची सवलत देत आहे. त्यामुळे महिलांना एसटी प्रवास करताना अर्धे तिकीट लागतं. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना, मुलींना मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.
शेतकऱ्यांना महाविकास आघाडीनं महत्त्वाची घोषणा केली आहे. मविआ सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेडीसाठी ५०,००० रुपयांचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवणार अशी घोषणा राहुल गांधींनी केली. कुटुंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत विमा देण्याची घोषणादेखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.
महालक्ष्मी योजनेची घोषणा करताना राहुल गांधींनी महायुती सरकारवर तोफ डागली. राज्य सरकार अदानींसाठी काम करत आहे. महागाई, कराच्या स्वरुपात लोकांची अक्षरश: लूट सुरु आहे. त्या लुटीचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे. त्यामुळेच त्यांना प्रवासात पूर्ण सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. सामान्य कुटुंबाच्या खिशावर ९० हजारांचा डल्ला मारला जात आहे. त्या बदल्यात महिलांना केवळ दीड हजार रुपये दिले जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.