Ovala Majiwada Vidhan Sabha: ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या ओवळा-माजिवडा मतदारसंघाचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गेल्या तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करतात.
घोडबंदर रोड येथे नव्याने वास्तव्याला येणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती ते थेट मीरा – भाईंदरमध्ये या मतदारसंघाचे टोक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. तर या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना सर्वाधिक ६१ हजार ३९९ असे भरघोस मताधिक्य मिळाले असल्याने या समीकरणातूनच सरनाईक यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे ‘मविआ’च्या जागावाटपात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाट्याला हा मतदारसंघ आला. या भागात असणारी आगरी समाजाची लक्षणीय संख्या पाहता ठाणे पालिकेचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे एकेकाळचे सहकारी असलेले सरनाईक व मणेरा विभक्त झालेल्या दोन्ही शिवसेनेतून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीमध्ये मनसेच्या तिकिटावर येथून निवडणूक लढवलेल्या संदीप पाचंगे यांनाच पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यावेळी २१ हजार १३२ मते मिळवणारे पाचंगे यंदा कशी मजल मारतात, याच
गणितावर या मतदारसंघातील उमेदवाराच्या जय-पराजयाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये अपराजित राहिलेल्या सरनाईक यांनी त्यांच्या कामांच्या माध्यमातून मतदारसंघात दबदबा निर्माण केला आहे. सर्व समाजघटकांचे समाजभवन, सर्वधर्मीय स्मशानभूमी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा बाबींमधून ते मतदारराजाला आकर्षित करतात. मात्र मतदारसंघ विकसित होत असल्याने येथील नागरी सुविधांवर पडणारा ताण, वाहतूक कोंडी ही या मतदारसंघात मोठी समस्या आहे. तर यासोबतच घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात उत्तुंग इमारती उभ्या राहिल्याने तेथील लोकसंख्येच्या मानाने त्यांना पाण्याचे नियोजन करणे ठाणे महानगरपालिकेला म्हणावे तसे शक्य झालेले नाही. त्यामुळे येथे अनेक भागात आजही टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या पट्ट्यातील भूमिपुत्र समाजाच्या समस्याही आहेत. या समस्यांनाच शिवसेना (उबाठा) उमेदवार नरेश मणेरा हात घालत मतदारांना भावनिक साद घालण्याचा येथे प्रयत्न करत आहेत. त्यातच जुने व निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख असलेल्या मणेरा यांच्या रूपाने मविआचे सर्वच घटकपक्ष एकत्रित घेत प्रचाराला मणेरा यांनी सुरवात केली आहे. मात्र या मतदारसंघात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलातील अमराठी समाजाला ते कशा पद्धतीने आकर्षित करतात, या राजकीय कौशल्यावरच त्यांचा ‘निकाल’ लागणार आहे. दुसरीकडे ओवळा – माजिवड्याचा गड स्वतःकडेच राखण्याचा ‘प्रताप’ सरनाईक करणार की मनसेचे संदीप पाचंगे यांना ‘राज’कीय करिष्मा तारणार, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.