Satara Crime: लग्न झाल्यानंतर मोमीना पठाण हिला पती शाहरुख पठाण, सासू सलीमा उर्फ अमीना इस्माईल पठाण हे दोघे स्वयंपाक आणि इतर कारणावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते.
हायलाइट्स:
- विवाहितेची घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या
- पती, सासू आणि पतीच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
- सातारा येथील संतापजनक घटना
पती शाहरुख पठाण हाही काहीही काम करत नसल्याने विनाकारण मारहाण करीत असत. सतत दारू आणि गांजा पिऊन आल्यावर काहीही कारण नसताना मारहाण करत घरात राहायचे असेल, तर वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता. जावई शाहरुख हा मुलीबरोबर असे वागत असतानाही मोमीनाचे वडील करीम शेख तिला संसारासाठी पैसे देत होते. यावेळी शाहरुख पठाण हा काही काम करत नसल्याने सासरे करीम शेख यांनी चिकन दुकान सुरू करण्यासाठी आर्थिक मदतही दिलेली होती. मात्र, चिकन दुकानही शाहरुख याला व्यवस्थित चालवता आले नाही.
दरम्यान, शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी मित्र सोन्या पंडित यांच्या सांगण्यावरून शाहरुख पठाण याने पत्नी मोमीना पठाण हिच्यावर संशय घेऊन व इतर घरगुती कारणावरून शिवीगाळ करून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून राहत्या घरी मोमीना हिने घराच्या अँगलच्या हुकाला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पती शाहरुख ईस्माईल पठाण, सासू सलिमा उर्फ अमिना ईस्माईल पठाण, मित्र सोन्या पंडित यांच्याविरुध्द मोमीना हिचे वडील करीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शाहरुख पठाण, सोन्या पंडित यांना अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे तपास करत आहेत.