विधानसभा निवडणुकीचे तिकीट देताना ठाकरे गटाकडून बाहेरच्या आयात उमेदवाराला पैसे घेऊन तिकीट देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोणी केला हा गंभीर आरोप आणि का जाणून घ्या.
१९८५ पासूनच प्रकाश खेडकर यांनी शिवसेनेची सेवा केली. असं असताना उमेदवारी देताना ठाकरे गटाला खेडकर कुटुंबीय सापडले नाही काय, त्या घराण्यातील एकही व्यक्तीला देखील उमेदवारी का मिळाली नाही असा सवाल हेमंत पाटील यांनी केला. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे. आज एकालाही उमेदवारी भेटली नाही. दत्ता कोकाटे, माधव पावडे यांना ही उमेदवारी देण्यात आली नाही. प्रामाणिक माणसाला तिकीट द्यायची भूमिका ही त्यांना नाही. पैसे घ्यायचे आणि बाहेरच्या माणसाला आणून उमेदवारी द्यायची हे ठाकरे गटात सुरू असल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असं काहीच चालत नाही एकनाथ शिंदे हे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन जातात आणि सगळ्यांना मदत करतात आणि आम्ही हाच भगवा निवडला आहे. यांच्याच मागे आम्ही राहू, असं देखील हेमंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले. विशेष म्हणजे नांदेड उत्तरची जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला सुटली आहे. काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाने संगीता पाटील डक या आयात उमेदवाराला एबी फॉर्म दिले. त्यामुळे संगीता पाटील डक या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत.
बंडखोरांवर कारवाई होणार
नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. नांदेड उत्तर ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. इथे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर मैदानात आहेत, तर याच मतदार संघातून भाजपचे विधानसभा अध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर दुसरीकडे दक्षिण मध्ये ही शिंदे गटाचा उमेदवार असताना भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते बंडखोरी केली आहे. याबंडखोरी वरून आमदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मागच्या वेळीही नांदेड दक्षिण मधून बंडखोरी झाली होती. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला होता. पण मतदार पक्षाच्या विचारांच्या मागे राहतात. बंडखोरांना मतदार थारा देणार नाहीत. बंडखोरांवर कारवाई कारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला आहे. दोन दिवसात बंडखोरांवर कारवाई होईल, अशी माहिती आमदार हेमंत पाटील यांनी दिली.