Uddhav Thackeray On Mahayuti : शहराची ओळख असलेले हे कोळीवाडे बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. कोळीवाड्यांचे अस्तित्व कायम ठेवून त्यांच्या मतानुसारच विकास करण्यात येईल’, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
करोना काळात आम्ही धारावी वाचवली आता पुन्हा वाचवू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘शहरातील गावठाणे आणि कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे., परंतु, शहराची ओळख असलेले हे कोळीवाडे बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. कोळीवाड्यांचे अस्तित्व कायम ठेवून त्यांच्या मतानुसारच विकास करण्यात येईल’, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. कोळीवाड्यात क्लस्टर विकास करून इमारती बांधल्या तर होड्या पार्किंगमध्ये लावून मासे गच्चीत सुकवायचे का, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाआघाडीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी-शपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, डावे पक्ष मांचे नेते उपस्थित होते. ‘जमलेल्या माझ्या महाराष्ट्रप्रेमी बांधवानो मातांनो, असे संबोधत ठाकरे यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.
‘सणासुदीच्या काळात जनतेसाठी आनंदाचा शिधा वाटला जात असून त्यात उंदराच्या लेंड्या मिळत आहेत. मात्र, मविआ सरकार आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत’, असे आश्वासन न्यकरे यांनी यावेळी दिले. संविधान बचावाची लढाई अजूनही संपलेली नसून त्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे’, असे ठाकरे यांनी अधोरेखित केले. ‘महायुतीच्या काळात राज्याची पीछेहाट’ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले. ‘राज्याचे देशातील स्थान घसरत असून पहिल्या क्रमांकावरून राज्य सहाव्या क्रमांकावर घसरले आहे.
राज्यात असे एकही क्षेत्र नाही, जिथे भ्रष्टाचार नाही. या भ्रष्टाचाराने इतका कळस गाठला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार झाला. राज्याचे हे भेसूर झालेले चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या’, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. ‘हे तोडफोडीचे सरकार’ ‘राज्यातील सध्याचे सरकार हे तोडफोड सरकार आहे, मध्य प्रदेश आणि मणिपूरमध्ये त्यांनी जे केले, तेच महाराष्ट्रात केले. हे चोरांचे सरकार असून त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजे’, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जनु खर्गे यांनी यावेळी केले. चोरलेल्या सरकारवर आरोपपत्र दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायला हवे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.
‘गरिबांची जमीन हिसकावण्याचा प्रकार’
धारावीच्या मुद्द्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा ‘अदानी’ सोबतच महायुती सरकारला धारेवर धरले. धारावी अदानी समूहाला दिली जात आहे. एक लाख कोटी रुपये इतके मूल्य असलेली जमीन गरिबांच्या ताब्यातून हिसकावली जात आहे. राज्यातील प्रकल्प अदानींच्या हाती सोपवले जात असून इतर प्रकल्प राज्याच्या बाहेर नेले जात असल्याचेही ते म्हणाले. ‘देशातील विविध संस्थांमध्ये केवळ संघाची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पात्रता नसलेल्या व्यक्तींनाही महत्त्वाचे पद दिले जात आहे’, असा आरोप त्यांनी केला.
‘देवाभाऊंची लाही लाही’
देवेंद्र फडणवीस यांनी मुंब्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा, या दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की, ‘छत्रपती म्हटले की देवाभाऊंच्या अंगाची लाही लाही होते. मुंब्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज, राज्यमाता जिजाऊ आणि अन्य महापुरुषांचे शिल्प आहे. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच जिल्ह्यातील आहेत. ठाणे जिल्ह्यात मंदिर बांधणे शिंदे यांना अवघड वाटत असेल तर त्यांना डोक्यावर घेऊन कशाला नाचता’, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.