Maharashtra Assembly Election 2024: १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पालिकेकडे अर्ज केला आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवसाच्या आधी ऐतिहासिक शिवाजी पार्कवर कोणाची सभा होईल याची उत्सुकता लागली आहे.
शिवाजी पार्कवर सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचारातील शेवट करावा अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे दोघांपैकी शिवाजी पार्क कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने १७ तारखेला सभा घेण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आहे. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी सभा घ्यायची आहे. त्या दिवशी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या मनसेला देखील शिवाजी पार्कवर सभा घ्यायची आहे. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहे. आणि त्यांच्या मतदारसंघात शिवाजी पार्क देखील येत असल्याने राज यांना १७ तारखेला अमित ठाकरेंसाठी शिवाजी पार्क येथे सभा घ्यायची आहे. या दोन्ही पक्षांसोबत अन्य काही राजकीय पक्ष शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे परवानगी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आहे. पालिकेच्या निमानुसार जो पक्ष प्रथम अर्ज करतो किंवा पत्र देतो त्याला पालिकेकडून परवानगी दिली जाते. मनसेने परवानगीसाठी आधी पत्र दिल्याचा दावा केला आहे.
या दिवशी मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे येणार असल्याने आयोगाने आणि पोलिसांनी आडमुठेपणा करून संघर्ष होऊ देऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच माहिम मतदारसंघात सभा घेण्याची गरज नाही कारण आपला मुंबईकरांवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.