Solapur Barshi News : आमचे कार्यकर्ते जाताना त्यांनी डिवचले, अश्लील चाळे केले, त्यामुळे गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत हा प्रकार घडला असल्याचा माहिती शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
दिलीप सोपल समर्थक सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरासमोर रात्री उशिरा अशा पद्धतीने घोषणाबाजी करणं अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी बार्शी नगरपरिषदचे माजी विरोधीपक्ष नेते तथा दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे.
शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा खुलासा
माजी आमदार आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या घरासमोर बुधवारी रात्री जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणाबाजीनंतर गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले, दिलीप सोपल समर्थकांनी याचा निषेध व्यक्त करत आमदार राजेंद्र राऊत यांना टार्गेट केले आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी याबाबत खुलासा देत माहिती दिली आहे.
बार्शी ते आगळगाव रस्ता हा सरकारी रस्ता आहे. या सरकारी रस्त्यावरून आमचे कार्यकर्ते जात होते. विरोधकांकडून आमच्या कार्यकर्त्यांना बघून अश्लील चाळे करण्यात आले. शिंदें सेनेच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून डिवचले गेले, त्यामुळे हा प्रकार घडला आहे, अशी माहिती राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
Solapur News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, बार्शीत वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?
बार्शीत रंगतदार निवडणूक
बार्शी विधानसभा मतदार संघ हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांचा अल्प मतांनी विजय झाला होता. दिलीप सोपल यांचा निसटता पराभव झाला होता. आमदारकीच्या निवडणुकीत नेहमी बार्शीत दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत असा सामना पाहायला मिळतो. यंदाच्या निवडणुकीत देखील दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत अशी निवडणूक सुरू आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि दलित या मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. मराठा आरक्षणामुळे राजेंद्र राऊत यांची राज्यभर चर्चा झाली होती.