Nagpur Ramtek Vidhan Sabha : नागपुरात रामटेक मतदारसंघात बंडखोर आमदाराच्या प्रचार साहित्यावर काँग्रेस नेत्याचं चित्र आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
रामटेकच्या जागेसाठी उबाठा उमेदवाराला तिकीट
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रामटेकची जागा शिवसेना उबाठा गटाला सुटली. त्यांनी तेथून विशाल बरबटे यांना संधी दिली. गेले दहा वर्ष त्या मतदारसंघाची मशागत करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक सुध्दा येथून लढण्यास उत्सुक होते. ही जागा काँग्रेसला सुटावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.
अपक्ष अर्ज भरत काँग्रेस नेत्याची बंडखोरी
राजेंद्र मुळक काँग्रेसच्या जागेसाठी अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तो मागे घ्यावा म्हणून उबाठाने प्रयत्न केले, त्यात यश आले नाही.
बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचं समर्थन असल्याचा सवाल उपस्थित
त्यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब होऊन ४८ तास उलटलेत. तरीसुद्धा काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. यामुळे रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचे सर्वच जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद आणि पंचायतींचे नगरसेवक तसेच सर्वच कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात जुंपले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे त्यांना समर्थन असल्यासारखे वाटते आहे.
याबाबत खासदार बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मुळक यांनी अर्ज भरला तेव्हा काँग्रेसचाही अर्ज भरला होता. त्यामुळे तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. मात्र, त्यानंतर मी वैयक्तिकरीत्या त्यांच्या प्रचारात सहभागी झालेलो नाही.’
बंडखोर उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर काँग्रेस नेत्याची छबी, महाविकास आघाडीत खळबळ; वेगळाच संशय
दोन दिवसांत कारवाई?
युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवलक्य जिचकार यांनीसुद्धा काटोलमध्ये बंडखोरी केली आहे. मुळक आणि जिचकार यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना म्हणाले, ‘दोन दिवसांत महाविकास आघाडीची राज्यस्तरीय बैठक आहे. त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल.’ त्यामुळे दोन दिवसांनंतर मुळक आणि जिचकारांवर कारवाईची शक्यता असल्याचे कळते.