Maharashtra Election 2024: सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर त्यांनी शब्द मागे घेत असल्याचे म्हटले आहे.
मी कोणाच्या आजारपणावर किंवा व्यंगावर बोललो नव्हतो तर सामाजिक आणि राजकीय चेहऱ्यावर बोललो होतो. निवडणुकीच्या काळात काही भावनिक मुद्दे निर्माण करून आपल्याला निवडणू्क जिंकता येतील का यात संपूर्ण महाविकास आघाडी गुंतलेली दिसते. कोणाच्या भावना मी दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असे खोत म्हणाले.
पवार कुटुंबियांवर सातत्याने टीका करात यावर सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात प्रतिस्थापितांसोबत विस्थापितांचा देखील आवाज आहे. आज विस्थापितांमधील एखाद्या शेतकऱ्यांचा पोरगा बोलायला लागला तर यांच्या पोटात गोळा येतो. अजित पवारांनी खोतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना सदाभाऊ म्हणाले, आम्ही गावगड्याची भाषा बोलतो. वाड्यातील लोकांना झोपडीतील लोकांचे कधीपासून झोंबायला लागले, असा प्रश्न त्यांनी विचारला.
अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते. दरम्यान आज सदाभाऊ खोत यांची पुण्यात पत्रकार परिषद होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली.