Bandra East Vidhan Sabha : अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज झाले होते.
कोण आहेत अखिल चित्रे?
मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष आहेत. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज झाले होते. तृप्ती सावंत यांना बाहेरून शेवटच्या क्षणी आयात करून मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे ते खट्टू झाले होते.
अखिल चित्रे यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व येथून मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास ११ हजार मतं मिळाली होती. मात्र यावेळी ते पूर्ण ताकदीनिशी लढण्यात इच्छुक होते.
आता अखिल चित्रे शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यांच्या पक्षांतराने मनसेला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात धक्का बसणार असून ठाकरे गटाचं बळ वाढण्याचा अंदाज आहे.
Akhil Chitre : मातोश्रीच्या अंगणात मनसेला सगळ्यात मोठा हादरा, राज ठाकरेंचा निकटवर्तीय नेता शिवबंधनात
अखिल चित्रेंची खदखद
याआधी, ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आणि भाजप पदाधिकारी यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला होता. माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे, गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोकं राज निष्ठा समजत असतील तर माफी आसावी मी असा राज निष्ठ नाही, असंही अखिल चित्रेंनी याआधी म्हटलं होतं.
वांद्रे पूर्वमध्ये तिरंगी लढत
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत.