Phulambri Vidhan Sabha : मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे पुन्हा परंपरेनुसार भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षात लढत होणार आहे. या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
त्यामुळेच या मतदारसंघाला दुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर अपक्ष उमेदवार रमेश पवार, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे सोबतच वंचित बहुजन आघाडीचे महेश निनाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळासाहेब पाथ्रीकर, बहुजन समाज पार्टीचे अमोल पवार यांच्यामुळे किती मतविभागणी होते व याचा फटका कोणाला बसेल याची चर्चा सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी नंतर २७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर हरीभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल पद मिळाले. त्यानंतर बागडे यांची वारसदार म्हणून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे टिकविण्याचे आवाहन अनुराधा चव्हाण यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
फुलंब्री मतदारसंघ झाल्यापासून आतापर्यंत बागडे आणि काळे यांच्यातच लढत झाली आहे. यामध्ये २००९ मध्ये फुलंब्री स्वतंत्र तालुका झाला. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे हरीभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याणराव काळे यांच्यात चार वेळा लढत झाली. यामध्ये २००४ ला औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे काळे यांनी भाजपचे बागडे यांचा नऊ हजार ११० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २००९ मध्ये फुलंब्री मतदारसंघात पुन्हा बागडे आणि काळे आमनेसामने आले. बागडे यांचा दोन हजार ५८७ मतांनी पराभव झाला होता. दोन्ही वेळेस निवडणुकीत पराभव झाल्यानंतर २०१४ ला पुन्हा एकदा बागडे आणि काळे यांच्यात लढत झाली. मोदी लाटेचा फायदा उचलून २०१४ च्या निवडणुकीत बागडे यांचा विजय झाला.
राज्यात भाजप-सेना महायुतीचे सरकार बनले त्यात बागडे यांना थेट विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर २०१९ ला बागडे आणि काळे परत एकदा आमनेसामने उभे ठाकले. यात बागडे यांचा १५ हजार मतांनी विजयी झाला, त्यानंतर बागडे यांना राजस्थानचे राज्यपालपद देण्यात आले; तर डॉ. कल्याण काळे खासदार झाले. यामुळे फुलंब्रीत दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. सोमवारी अनेक इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे पुन्हा परंपरेनुसार भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षात लढत होणार आहे. या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
जरांगे यांच्या उमेदवारांची माघार
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या २२ उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. हे २२ उमेदवार कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. त्यांची भूमिका उमेदवार निवडीकडे निर्णायक राहणार आहे.
फुलंब्रीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
निवडणुकीत कोण बाजी मारणार या चर्चेला उधाण आले आहे. विलास औताडे, अनुराधा चव्हाण यांच्यात थेट लढत होत असली, तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महेश निनाळे तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश देविदास पवार, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे रिंगणात असल्याने अटीतटीची लढत होणार असे चित्र दिसत आहे.
फुलंब्री मतदारसंघाची रचना
फुलंब्री तालुक्याची निर्मिती १९९९ मध्ये झाली. सिल्लोड तालुक्यातील ४२ गावे कन्नड तालुक्यातील सहा गावे, खुलताबाद तालुक्यातील पाच गावांचा समावेश करून फुलंब्री तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती. फुलंब्री तालुका निर्मितीपूर्व हा ‘औरंगाबाद पूर्व’ मतदारसंघ होता त्यात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचन होऊन वरील गावे व छत्रपती संभाजीनगर शहरातील आठ वॉर्ड समाविष्ट करण्यात आली आणि नव्याने फुलंब्री विधानसभा ह मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघाच पहिले आमदार होण्याचा मान डॉ. कल्याण काळे यांना मिळाला.
फुलंब्री विधानसभा
एकूण मतदार ३, ७०, ७०३
पुरुष मतदार १,९२,८५८
स्त्री मतदार १,७७,८४०
इतर ५
फुलंब्री तालुका मतदार १,३६,८६९
छत्रपती संभाजीनगर तालुका, शहरातील दहा वॉर्डातील २,३३,८३४