Mahim Vidhan Sabha : वचननामा जाहीर झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
माहीम माझं आहे, त्यामुळे प्रचारसभेची मला आवश्यकता वाटत नाही. माहीम हा माझा… शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तसं बघितलं तर, मुंबईत कालची सभा झाली आणि १७ तारखेची सभा आहे. पण त्याच्या अलिकडे पलिकडे मी मुंबईच्या बाहेरच आहे. कारण मुंबईकरांवर माझा विश्वास आहे. मुंबईकरांचा माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहेच. पण सगळ्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. मी एके ठिकाणी गेलो आणि दुसरीकडे नाही म्हणजे मी लक्ष देतोय किंवा नाही देतोय असं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वेळच अशी आहे की दिवसाला चार-पाच सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ पूर्ण करु शकत नाहीये. दिवसाच्या उन्हाच्या वेळा आणि प्रवासाचा मधला वेळ बघता ते शक्य नाही. शिवाजी पार्कचं बोलायचं तर १७ नोव्हेंबर तारीख आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची ती शेवटची संध्याकाळ आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे १७ नोव्हेंबर ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी आहे, असंही उद्धव म्हणाले.
Uddhav Thackeray : माहीममध्ये प्रचारसभा का नाही? उद्धव ठाकरे थेट म्हणाले, कारण तिथे माझा…
ठाकरेंच्या मुंबईत सभा कधी?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईतील पहिली जाहीर सभा काल, ६ नोव्हेंबरला बीकेसी मैदानात पार पडली. आता उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची सांगता सभा १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता आणि १८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता पुन्हा बीकेसीच्या मैदानात होणार आहे.
आदित्य ठाकरेंचाही माहीम वगळून प्रचार
आदित्य ठाकरे मुंबईच्या विविध मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा करणार आहेत. परंतु माहीम मतदारसंघात त्यांचा कुठलाही दौरा नियोजित नाहीये. वडाळा, शिवडी, भायखळा, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व या भागात प्रचार करणाऱ्या आदित्य दादाने माहीम-दादरचा भाग जाणूनबुजून वगळल्याचेही बोलले जात आहे.