Lawrence Bishnoi T-shirts: गुन्हे विश्वापासून तरुणाईला परावृत्त करणे काळाची गरज असताना काही कंपन्या अधोविश्वातील कुख्यात गुंडांचे फोटो असलेल्या कपड्यांची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशभरातील तरुणांमध्ये लॉरेन्स बिष्णोई, दाऊद इब्राहिम यांसारख्या इतर अंडरवर्ल्डच्या गुंडांबाबत कमालीची उत्सुकता आहे. यावर रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपट, सध्या ओटीटीवर अनेक सिरीज आल्याने याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच फ्लिपकार्ट (Flipkart), अलीएक्स्प्रेस (AliExpress), टीशॉपर (TeeShopper), आणि ईटीसी (Etsy) सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉरेन्स बिष्णोई आणि दाऊद इब्राहिम यांच्या चित्रांचे टी-शर्टc विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण करणारी अशी उत्पादने तरुणांवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. ही सामग्री समाजाच्या मूल्यांना हानी पोहोचवते आणि तरुणांमध्ये चुकीच्या प्रवृत्तींचा प्रसार होऊ शकतो. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याबाबत या कंपन्यांच्या ऑनलाइन व्यासपीठावर जाऊन शहानिशा केली.
वेगवेगळ्या कंपन्यांना ऑनलाइन पद्धतीने गुंडांचे फोटो असलेले कपडे विक्री करीत असल्याची खात्री झाली. या प्रकाराला आळा बसवा यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चार ऑनलाइन कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.