विनित जांगळे, ठाणे : निवडणूक फिवर आला की सर्वांना ‘फिव्हर’ चढतो, वेगवेगळ्या प्रकारचे ‘ताप’ असतात. ते दूर करावे लागतात, तेच करत अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना केली. शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी मेळाव्याआधी बंद दाराआड चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना – भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे महायुतीमधील ‘तापा’वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता रामबाण इलाज केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यात महायुतीचा प्रचार करत आहेत. दुसरीकडे शिंदे यांच्या होमपीचवरच महायुतीमधील शिवसेना – भाजपच्या नेत्यांचा कलगीतुरा थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बुधवारी ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या शिंदे यांनी या नेत्यांमधील विसंवाद दूर करण्यासाठी बंद दाराआड बैठक घेली. ठाणे शहर मतदारसंघामधील भाजप उमेदवार संजय केळकर यांची उमेदवारी घोषित होण्याआधीच माजी महापौर, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे व माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या दोघांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारी केल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. शिंदे यांच्या आदेशानंतर या दोघांनीही बंडाची तलवार म्यान केली. मात्र ठाणे शहरमधील प्रचाराच्या रणधुमाळीत या दोघांचीही अनुपस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अखेर भाजप उमेदवार संजय केळकर व मीनाक्षी शिंदे यांच्याशी शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत शिंदे यांनी ‘कानमंत्र’ही दिला. तसेच महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी ‘कामाला लागा’ असे आदेश शिंदे यांनी दिले.
Palghar News: विधानसभेतील बंडखोरीवरून भाजप-शिवसेना शिंदे गटात जुंपली, ‘या’ मतदारसंघात वाद विकोप्याला
संजय भोईर यांची अनुपस्थिती
ठाणे शहर मतदारसंघात येणाऱ्या ढोकाळी, बाळकूम, कोलशेत पट्ट्यात प्रभाग असणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी या मेळाव्याला दांडी मारली. भोईर यांचा संजय केळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यांची नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचे त्यांच्या मेळाव्यातील अनुपस्थित राहण्यावरुन स्पष्ट झाले. यासंदर्भात संपर्क साधला असता मी कामानिमित्त शहराबाहेर असल्याने मेळाव्याला हजर राहू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया भोईर यांनी दिली. मात्र केळकर यांच्या प्रचारासाठी अद्याप मला कोणीही संपर्क साधलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भोईर म्हणाले.