यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या दोन आखाड्यात दोन ठाकरे उतरले आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. तर त्यांचे चुलत बंधू अमित ठाकरे माहीममधून रिंगणात आहेत.
माहीममध्ये प्रचारसभा घेणार नसल्याचं शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तर राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात सभा घेतली असली, तरीही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करणं टाळलं. त्यामुळे पडद्याआड ठाकरे कुटुंबात काही ठरलंय का, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघांमध्ये यंदा तिहेरी लढत होत आहेत. अमित ठाकरेंसमोर शिवसेना उबाठानं महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. इथे शिंदेसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा मैदानात उतरवलं आहे. आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि शिंदेसेनेच्या मिलिंद देवरांचं आव्हान आहे. दोन्ही ठाकरेंसाठी या लढती प्रतिष्ठेच्या आहेत.
माहीम आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे मला प्रचारसभा घेण्याची गरज वाटत नाही. मुंबईत महाविकास आघाडीची एक सभा झालेली आहे. आता माझ्या सगळ्या सभा शहराबाहेर होतील. मुंबईकरांवर माझा विश्वास आहे आणि मला मुंबईकरांबद्दल खात्री वाटते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची सांगता शिवाजी पार्कात होऊ शकते. शिवाजी पार्क माहीम मतदारसंघातच येतं. पण ही सभा केवळ माहीमसाठी नसेल. उद्धव आणि आदित्य ठाकरे अमित ठाकरेंसाठी प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण ठाकरे मुंबईच्या विविध भागांमध्ये सभा घेऊ शकतात, असं पक्षातील काही नेत्यांनी सांगितलं.
एकमेका सहाय्य करु, दोघे गाठू विधानसभा? ठाकरेंच्या समझोत्याची चर्चा; माहीम, वरळीत चाललंय काय?
गुरुवारी राज यांनी मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्यासाठी वरळीत सभा घेतली. त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. पण आदित्य ठाकरेंवर टीका करणं टाळलं. उद्धव आणि आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्या प्रचारासाठी माहीममध्ये प्रचारसभा घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर राज यांनी वरळीत सभा घेतली असली तरीही त्यांनी आदित्य यांना लक्ष्य करणं टाळलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काहीतरी मेतकूट जमलंय का, अशी चर्चा सुरु झाली आहे.