कमळ की तुतारी? नाशिक पूर्वमध्ये आजी-माजी भाजपेयींतच रंगणार सामना

Nashik East Assembly Constituency: या निवडणुकीत ‘जात फॅक्टर’ कळीचा मुद्दा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात छोटे-मोठे पक्ष व अपक्ष मिळून १३ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत महायुतीचे राहुल ढिकले व महाविकास आघाडीचे गणेश गिते यांच्यात होणार आहे

रामनाथ माळोदे, पंचवटी : धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा पंचवटी व तपोवनाचा परिसर नाशिक पूर्व मतदारसंघात येतो. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थाचा केंद्रबिंदू याच मतदारसंघात आहे. आता दोन वर्षांनी सिंहस्थ होणार असल्याने यंदाची निवडणूक महत्त्वाची ठरणारी आहे. भाजपने येथून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधूनच ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेल्या गणेश गिते यांच्याशी होत आहे. त्यामुळे आजी-माजी भाजपेयींतच ‘सामना’ रंगणार असून, कमळ चालणार, की तुतारी अशी चर्चा मतदारसंघात रंगत आहे.

२००९ मधील पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत येथे मनसेने बाजी मारली. मात्र, त्यानंतर २०१४ व २०१९ ला भाजपने हा गड राखला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्याने सानप यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी केली. त्यात त्यांचा १२ हजार मतांनी पराभव झाला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे नाशिक जिल्ह्याचा कल असतानाही नाशिक पूर्व मतदारसंघाने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना १० हजार ४०० मतांचे मताधिक्य दिले. चार लाख ६ हजार ३९५ मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात मराठा, वंजारी, ओबीसी समाजासह आदिवासी, दलित, गुजराती या समाजघटकांचा प्रभाव आहे. या निवडणुकीत ‘जात फॅक्टर’ कळीचा मुद्दा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात छोटे-मोठे पक्ष व अपक्ष मिळून १३ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत महायुतीचे राहुल ढिकले व महाविकास आघाडीचे गणेश गिते यांच्यात होणार आहे. या दोघांसह येथून प्रसाद सानप (मनसे), करण गायकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), प्रसाद जमखिंडीकर (बहुजन समाज पक्ष) आदी १३ उमेदवार रिंगणात आहेत.
मालेगाव मध्य वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल; गिरीश महाजनांचा दावा
भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप व स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांची भाजप पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी ढिकले यांचा प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडून अतुल मते व जगदीश गोडसे इच्छुक असताना त्यांना डावलून गिते यांना उमेदवारी दिल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गितेंकडून सुरू आहे. गणेश गिते हे २०१७ मध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सलग दोन वर्षे स्थायी समिती सभापती होते. भाजपकडून ढिकले यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने त्यांना प्रचाराला अधिक अवधी मिळाला आहे. गिते यांनीही प्रचारात गती घेत मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. अपक्ष उमेदवारी करणाऱ्या गणेश गिते या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारानेही येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. पंचवटीसह नाशिकरोडचा भाग, तसेच मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर, दसक व पंचक या सात गावठाण व मळे परिसराचाही या मतदारसंघात समावेश आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक असा संमिश्र लोकवस्तीचा हा मतदारसंघ आहे.
‘नाशिक मध्य’त फरांदे-गिते थेट लढत; विजयाची हॅटट्रिक, की पराभवाचा वचपा? कोण मारणार बाजी?
…हे आहेत कळीचे मुद्दे
सिंहस्थासाठी साधुग्रामाचे आरक्षण व भूसंपादन, रिंगरोडचे रुंदीकरण व भूसंपादन, घाटांचे विस्तारीकरण, राज्य मार्गाचे काँक्रिटीकरण, वाहतूक कोंडी, धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास, वाढती गुन्हेगारी हे नाशिक पूर्व मतदारसंघातील कळीचे मुद्दे आहेत.

मतदारांची संख्या
पुरुष : १,९७,५७६
महिला : २,०८,८०७
एकूण : ४,०६,३९५

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

balasaheb sanapbjpganesh gitemaharashtra vidhan sabha nivadnuk 2024marathi newsnashik east constituencynashik news todayNCP Sharad Pawar Grouprahul dhikaleनाशिक बातम्या
Comments (0)
Add Comment