Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडालेला असताना सगळ्याच उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. पण प्रचारात होणाऱ्या खर्चावर निवडणूक विभागाच्या कॅमेऱ्याची नजर असल्यानं सगळ्याच उमेदवारांची गोची झाली आहे.
मुरबाडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार किसन कथोरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारादरम्यान ते एका दुर्गम भागात गेले. एका ठिकाणी ते कार्यकर्त्याकडे थांबले. नुकतीच दिवाळी होऊन गेल्यानं कथोरेंच्या एका कार्यकर्त्यानं त्यांच्यापुढे थाळी आणून ठेवली. त्यात काजू, बदाम होते. कथोरे आणि त्यांच्या सोबत असलेल्यांनी थाळीतले काजू-बदाम पटापट तोंडात टाकले. हा सगळा प्रकार निवडणूक आयोगाच्या कॅमेऱ्यानं टिपला. लोकमतनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या आणि परराज्यातून आलेल्या अधिकाऱ्यानं काजू, बदामाचा खर्च कथोरेंच्या निवडणूक खर्च जोडला. याचा कथोरेंनी धसकाच घेतला. त्यामुळे आता कोणी कार्यकर्ता काही खायला आणू का म्हणाला तरी कथोरे हात जोडून मोकळे होतात. कारण अधिकाऱ्यांचा कॅमेरा बारीकसारीक गोष्टी टिपत असतो आणि त्या सगळ्याचा हिशोब होत राहतो.
अनेकदा प्रचारफेरीत उमेदवारांचं औक्षण करतात. ओवाळणीचं ताट रिकामं ठेवू नये म्हणून उमेदवार ओवाळणी देतात. असंच एका उमेदवाराचं ठिकठिकाणी औक्षण झालं. अलीकडेच भाऊबीज होऊन गेल्यानं त्या उमेदवारानं सगळ्याच लाडक्या बहिणींच्या ताटात ओवाळणी दिली. खर्चावर लक्ष ठेवून असणाऱ्या अधिकाऱ्यानं कॅमेऱ्यात दिसलेल्या नोटा मोजल्या आणि ती रक्कम खर्चात समाविष्ट करुन घेतली. त्यामुळे उमेदवारानं आता ओवाळणीचा धसका घेतला आहे.
आणखी एका उमेदवारानं दहा वाहनांचा ताफा घेऊन प्रचार रॅली काढली. त्यात काही हौशी कार्यकर्ते सहभागी झाले. व्हिडीओग्राफरनं रॅली कॅमेऱ्यात टिपली. अतिरिक्त वाहनांचा खर्च त्यानं उमेदवाराच्या खर्चात जोडला. कार्यकर्त्यांची हौस उमेदवाराला महागात पडली. अशा कार्यकर्त्यांना समजवायचं कसं, त्यांना लगाम घालायचा कसा, असा प्रश्न आता उमेदवारांना पडला आहे.