Raj Thackeray News: विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असली तरी राज ठाकरे यांच्या मनसेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे यांनी कधी मराठीचा मुद्दा तर कधी हिंदुत्व तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन तर कधी त्यांचा विरोध, कधी उत्तर भारतीयांवर टीका… राज ठाकरे या विधानसभा निवडणुकीत कोणाचे गणित बिघडवणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. जाणून घेऊयात काय आहे राज ठाकरे यांची रणनिती…
राज ठाकरेंच्या मनसेने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरुद्ध २२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर मुंबईतील वरळी मतदारसंघातून त्यांनी संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे, हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. मनसेला मिळणाऱ्या मतांमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचा खेळ बिघडू शकतो.
२००५ साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेच्या २८८ जागांमध्ये ही संख्या फार मोठी नसली तरी यामुळे शिवसेनेची झोप उडाली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेनेला मिळणाऱ्या मतांना स्वत:कडे खेचले होते. त्यानंतर मात्र मनसेची कामगिरी घसरली. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देत असल्याचे सांगत राज्यातील महायुतीला मतदान करण्याचे आव्हान केले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे महायुतीसोबत जातील अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. आता २३ तारखेच्या निकालात राज ठाकरेंचा प्रभाव किती होता आणि त्याचा कोणाला कसा फटका बसला हे दिसेल.