Raj Thackeray in Guhagar : राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारासाठी गुहागरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील प्रस्थापितांवर टीका करत आता पक्ष बदलायची वेळ आल्याचं सांगितलं.
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे तिन्ही जिल्हे अख्खा महाराष्ट्र चालवू शकतात, इतकी ताकद या कोकणात आहे, पण कोणाला काही करायचं नाही. तुम्ही त्यालाच दरवेळेला निवडून देत आहात, त्यामुळे आता हा बदल करायचा असेल, तर तुम्हाला या पक्षांना सोडावं लागेल, असं राज यांनी सुनावलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अभ्यंकर, वैभव खेडेकर, गुहागर येथील उमेदवार प्रमोद गांधी, दापोली येथील मनसे उमेदवार संतोष अबगुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तुमच्या जमिनी हडपायलाच बसले आहेत…
राज पुढे म्हणाले की, तुम्ही आजवर ज्यांना निवडून दिलंत, तेच हे सगळे व्यवहार करत आहेत. तुमच्या जमिनी हडपायला तेच बसले आहेत. राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा मग तुम्हाला दाखवतो सत्ता काय असते. अहो गोवा काय घेऊन बसलात सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे घेऊन जाऊ इतकी ताकद या कोकणात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. कोकणामध्ये असा बदल तुम्हाला हवा असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा पक्ष बदलावे लागतील, अन्यथा तुमच्या हाताला काही लागणार नाही. तुम्ही ज्यांना आजवर मतदान केलंत त्या सर्वांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना विजयी करा, तुम्हाला कोकणात चमत्कार करून दाखवतो, अशी राजगर्जना गुहागर येथील सभेत केली.
तुम्ही आजवर चुकीच्या माणसांना निवडून दिलेत
कधीही कोकणात या हे कोकण भुरळच घालतं, मी ज्या ज्या वेळेला परदेशात जातो त्या त्या वेळेला तिथे समुद्रकिनारी डोंगर पाहतो, त्यावेळेला नेहमी खंत वाटते परमेश्वराने आम्हाला हे सगळं कोकणात दिलं आहे, मग आमच्याकडे का नाही होत? तुम्ही कोकणात जन्माला आलात हे तुमचं खर तर भाग्य आहे, पण एकाच बाबतीत तुमच दुर्भाग्य आहे की तुम्ही चुकीची माणसं निवडून दिली. आजपर्यंत ज्यांनी स्वतः काही केलं नाही, आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांची अनेक फार्महाऊस झाली, पण या भागात म्हणून काही आलं नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी येथील प्रस्थापितांवर निशाणा साधला आहे.
कोकणात महाराष्ट्र चालवण्याची ताकद
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे तीन जिल्हे केवळ पर्यटन उद्योगावरती अख्खा महाराष्ट्र चालवू शकतात. याचे उदाहरण बाजूला असं गोव्यातच घ्या, तुम्हाला गाव, तालुका, घर सोडण्याची गरज नाही. कोकणातील पर्यटनाच्या विषयावर कोणते प्रश्न मांडले गेले? काहीही करत नाहीत, अशा शब्दात राज यांनी समाचार घेतला आहे.
आजवर चुकीच्या माणसांना निवडून दिलं, तेच तुमच्या जमिनी हडपायला बसलेत; गुहागरमध्ये राज ठाकरेंचं टीकास्त्र
आजवर कोकणाचा कॅलिफोर्निया यांना बनवता आला नाही, फक्त घोषणा झाल्या, आमच्याकडे साधी हॉटेल्स येत नाहीत, काहीही आपल्याकडे येत नाही, कारण कोणालाही काहीही दिलेलं नाही, तुम्ही तरीही मतदान करता. दर पाच वर्षांनी आपल्या पिढ्यांच्या- पिढ्या बरबाद करून टाकता अशा शब्दांत कोकणाबद्दल राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.