Anil Deshmukh Reaction On Rajdeep Sardesai Book : पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं १०० टक्के खरं असून भाजपने ईडी आणि सीबीआयचा वापर करत अनेक नेत्यांवर दबाव टाकल्याचं म्हटलं आहे.
पुस्तकात लिहिलेलं १०० टक्के खरं – देशमुख
राजदीप सरदेसाई सरदेसाई यांनी पुस्तकात जे काही लिहिले आहे ते १०० टक्के सत्य असल्याचे देशमुख म्हणाले. ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं ही सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ यांचवरही दबाव होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भुजबळ साहेबांवर हा दबाव होता आणि पुन्हा एकदा संपूर्ण तपासाला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता नव्हती, असे देशमुख म्हणाले. त्यामुळे या सर्वांनी भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
मी सही करण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी सीबीआय होती….
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीचा माझ्यावरही दबाव होता, पण मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं मी तुमच्या दबावाला मानणार नाही, तुम्हाला ईडी लावायची आहे, सीबीआय लावायची आहे लावा, पण उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख तुम्ही पाठवलेल्या एफिडेविटवर सही करणार नाही. ज्या दिवशी मी एफिडेविटवर सही करण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आली, काही दिवसांनी ईडी आली, मला अटक करण्यात आली. जर मी सुद्धा बीजेपी बरोबर जाऊन बसलो असतो, तर आज मी मंत्री असतो.’
ईडी-सीबीआयचा वापर, भुजबळांवर भाजपचा १०० टक्के दबाव, राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकावरुन अनिल देशमुखांचा दावा
पुस्तकाचे राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांना करू द्या – राजदीप सरदेसाई
पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणाले की, छगन भुजबळ माझ्याशी बोलत होते, त्यावेळी माझ्यासोबत अनेक लोक होते. यापेक्षा मला अधिक काही बोलायचे नाही, असे ते म्हणाले. तसेच पुस्तकाचे राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांना करू द्या मी याच्यात पडणार नाही. १८ महिन्यांपासून मी पुस्तक लिहित आहे, त्याच्यावर एक चॅप्टर हा महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्रावर जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर मी लिहिले असल्याचं ते म्हणाले.