Sunetra Pawar: लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही बारामतीत पवार कुटुंबात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे आणि शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे
अजित पवार राज्यभरात प्रचार करत आहेत. त्यामुळे बारामतीमधील त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी हाती घेतली आहे. सध्या त्या गल्लोगल्ली फिरत अजित पवारांचा प्रचार करत आहेत. आज त्यांच्या प्रचारावेळी एक भन्नाट किस्सा घडला. अजित पवारांचं प्रचारपत्रक वाटताना रस्त्यावर एक तरुण हातात पिवळा कार्डपेपर घेऊन उभा होता. सुनेत्रा पवारांना पाहताच त्यानं दोन्ही हात उंचावले. त्यात कार्डपेपर धरला आणि त्यावर लिहिलेला मजकूर सुनेत्रा पवारांना दाखवला.
कार्डपेपर लिहिण्यात आलेला मजकूर खासदार सुनेत्रा पवारांनी वाचला. ‘वहिनी, दादांना सांगा, बारामतीमध्ये आयटी पार्क आणायला,’ अशी मागणी तरुण करत होता. त्याखाली एकच वादा, अजितदादा ही घोषणा लिहिण्यात आलेली होती. सुनेत्रा पवारांनी या तरुणासोबत त्रोटक संवाद साधला. पवारांनी त्याच्यासोबत फोटो काढला. त्यावेळी तरुणानं हातात कार्डपेपर धरलेला होता. फोटो काढल्यानंतर सुनेत्रा पवार पुढील प्रचारासाठी निघून गेल्या.
बारामतीत पवार विरुद्ध पवार
लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात होत्या. तर शरद पवारांच्या पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळेंना तिकीट देण्यात आलं. प्रत्यक्षात हा सामना नणंद विरुद्ध भावजय असा होता. पण त्याला शरद पवार विरुद्ध अजित पवार संघर्षाची किनार होती. या प्रतिष्ठेच्या लढतीत शरद पवारांनी बाजी मारली. सुप्रिया सुळेंनी दीड लाखांहून अधिकच्या फरकानं विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून ४५ हजारपेक्षा अधिक मतांची मोठी आघाडी घेतली होती. आता याच मतदारसंघातून अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र मैदानात आहेत.