Mumbai News: मुलुंड विधानसभा मतदारसंघातील प्रकल्पावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही श्रेयवाद दिसून आला आहे.
हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा मुलुंड मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील या दोघांनीही केला आहे. प्रचारातही हा मुद्दा त्यांनी मतदारांसमोर आणला आहे. मुलुंडचे आमदार आणि मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी हे काम जलदगतीने होण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेने सप्टेंबरमध्ये मुलुंड (पूर्व) मधील पूर्व द्रुतगती मार्ग ते टाटा कॉलनी या नवीन मिसिंग लिंकसाठी आणि मुलुंडमधील आणखी दोन रस्त्यांसाठी ३३ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रकल्पाचा कार्यादेश तुकताच जारी केला.
विकास आराखड्यात येथे ७० मीटर लांबीचा १८.३० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित होता. सर्व आवश्यक मंजुरीसाठी मुंबई महापालिका, नगरविकास विभाग आणि मिठागर आयुक्तांसह सर्व संस्थांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे आमदार कोटेचा यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, हे काम मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे उत्तर पूर्व मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनीही सांगितले.
आपल्या प्रयत्नांमुळेच यश आल्याचे पाटील म्हणाले. मुलुंड पुर्वेकडील द्रुतगती महामार्गावर म्हाडा कॉलनी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी होऊ नये म्हणून टाटा कॉलनी येथून पर्यायी मार्ग देण्यात यावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा वाहतूक विभाग तसेच महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांसमोर मांडल्याचे ते म्हणाले.