Mumbai News: मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई समुद्रातील बोटींवर यावेळी केली जाणार आहे.
हायलाइट्स:
- ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’
- अभियानाचा आज शुभारंभ
- निवडणूक अधिकारी, कलाकारही सहभागी होणार
समुद्रातील बोटींवर विद्युत रोषणाई
मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई समुद्रातील बोटींवर यावेळी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव यांचे शिष्टमंडळ तसेच यावेळी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित राहणार आहेत. यावेळी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, सिने कलाकार अर्जुन कपूर, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक मिलिंद इंगळे, गायक वैशाली नेमाडे, गायक राहुल सक्सेना आदी खेळाडू व कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध कलांच्या सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. डाक कार्यालयाने तयार केलेल्या निवडणूक विषयक डाक तिकिटाचे अनावरण यावेळी केले जाईल.
त्याचप्रमाणे उपस्थितांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाईही समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण, फ्लॅश मॉब यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.