Uddhav Thackeray: महाराजांचा अपमान करून कोश्यारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचे, हे सहन करू शकत नाही. महाराष्ट्राच्या हृदयात झालेली ही जखम आहे, असेही ठाकरे म्हणाले.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. ठाकरे म्हणाले, आपण महाराराष्ट्रप्रेमी आहोत, पलीकडे जे आहेत, ते महाराष्ट्र लुटणारे, महाराष्ट्रद्रोही आहेत. शिवरायांच्या मंदिराचा विषय फडणवीसांना सहनच होत नाही. शिवाजी महाराज म्हटले की त्यांच्या अंगाची आग आग होते. त्यांच्या पोटात दुखते. त्यांनी आम्हाला आव्हान दिले. मुंब्य्रामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा. मुंब्रापण माझाच आहे. मंदिर महाराजांचे नाही तर काय मोदींचे बांधायचे? यांना वाटते की शिवाजी महाराज म्हणजे मत मिळवण्याचे मशीनच आहे. जाऊ तिथे खाऊ अशी यांची वृत्ती आहे. महायुतीचे हे भ्रष्ट सरकार आहे. आपल्या दैवताच्या पुतळ्यातही यांनी पैसे खाल्ले. अशुभ हाताने केलेले कोणतेही काम कधीही यशस्वी होत नाही, म्हणूनच मोदींच्या हाताने उभारलेला पुतळा वर्षभरातच कोसळला. हे महाराजांचे नाव पुसायला निघालेत. महाराजांचा अपमान करून कोश्यारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचे, हे सहन करू शकत नाही. महाराष्ट्राच्या हृदयात झालेली ही जखम आहे, असेही ठाकरे म्हणाले.
मोदींसह भाजपवाल्यांची मला कमाल वाटते. दरोडेखोरांना घेऊन तुम्ही आमच्या अंगावर चालून येता. आम्ही तुमच्यासोबत नसतो तर मोदी पंतप्रधान तर देवेंद्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. हिंदुत्व हिंदुत्व म्हणून भ्रम निर्माण केला. आम्ही तुमच्या मागे आलो. केंद्रात गेल्यानंतर आम्हाला लाथा घालायला लागलात, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
योगी, आम्हाला शिकवू नका
योगींनी आम्हाला एकतेची व्याख्या शिकवू नये. तुमच्या महायुतीमध्ये बघा, तुमचे गुलाबी जॅकेटवाले अजित पवार यांनीच सांगितले की बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन लुडबूड करू नये. आम्ही कसे राहावे, याच्या भानगडीत पडू नये. महायुतीमध्येच एकवाक्यता नाही. मग योगींनी अजित पवारांनाच काय ते विचारावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.