Vidhan Sabha Nivadnuk: नगरमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. येथून महायुतीतील घटक पक्षातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे.मात्र, शिवसेनेच्या नेत्यानेही उमेदवारी अर्ज भरल्याने तिढा निर्माण झाला आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासमोर महायुतीच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले असून मीच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा दोघेही करत होते. शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार लहू कानडे यांना एबी फाॅर्म देण्यात आला होता.
माघारीच्या दिवशी भाऊसाहेब कांबळे यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते दिवसभर नाॅट रिचेबल राहिले आणि अर्ज कायम राहीला. भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून बॅनरवर विखे पाटलांचे फोटो झळकवले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी भाऊसाहेब कांबळे यांच्या गोंधवणी गावात महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी श्रीरामपूरचा महायुतीचा उमेदवार लहू कानडे असून कांबळेंना गर्भीत इशारा दिलाय.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
भाऊसाहेब कांबळे यांना माझी विनंती आहे की भाऊसाहेब आता पुष्कळ झालं. तुम्ही माघारीच्या दिवशी नॉट रिचेबल होता परंतु आता रिचेबल आहात. आमचे महायुतीचे उमेदवार फक्त आणि फक्त लहू कानडे आहेत. आता माझे फोटो तुम्ही अजिबात लावू नका. तुम्ही विश्वासघात केला, तुम्हाला पाठिंबाही नाही आणि तुम्हाला क्षमा नाही. आपला निरोप वरचा ही तोच आणि आतलाही तोच आहे. जे आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो, असे म्हणत विखे पाटलांनी भाऊसाहेब कांबळे यांना चांगलच सुनावलं आहे.
श्रीरामपुरात महायुतीत गोंधळ
महाविकास आघाडीत काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापत काँग्रेसचे हेमंत ओगले यांना महाविकास आघाडीचे तिकीट दिले, त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण, अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती. मात्र शेवटच्या क्षणी लहू कानडे अजितदादा गटात गेल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, अनेक दिवसांपासून महायुतीच्या तिकटासाठी प्रयत्नशील असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी देखील अर्ज दाखल केला होता.
Radhakrushna Vikhe Patil: विश्वासघात केला, बॅनरवरून माझा फोटो हटवा, विखे पाटील नाराज, शिंदेंचा उमेदवार एकाकी पडला
माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याशी चर्चा केल्यानंतर माघार घेतली. तसेच, आरपीआयमध्ये असलेले राजाभाऊ कापसे यांनी देखील मनसेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा पद्धतीने महायुतीमध्ये बराचसा गोंधळ पाहायला मिळाला. मात्र, आता विखे पाटलांनी महायुतीचे उमेदवार फक्त लहू कानडे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात श्रीरामपूरचे मतदार कोणाच्या बाजूने मत टाकणार हे पहाणे महत्त्वाचे असेल.