Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएम सत्तेत असेल. आम्ही मंत्री असू, असा विश्वास एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे.
‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या आमदारांची गरज महाविकास आघाडीला पडली, तर त्यावेळी आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहोत. मागच्या अनेक महिन्यांपासून मी मविआच्या मागे लागलो होतो की तुम्ही आम्हाला सोबत घ्या. आम्ही तुमच्या सोबत येण्यास तयार आहेत. पण त्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही. पण उद्या अशी परिस्थिती येऊ शकते की शरद पवार, उद्धव ठाकरे माझ्या घरी येतील आणि सरकार स्थापन करण्यासाठी विनंती करतील,’ असं जलील म्हणाले.
महाविकास आघाडीनं तुम्हाला सोबत का घेतलं नाही, असा प्रश्न जलील यांना विचारण्यात आला. त्यावर एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेसला रस होता. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तटस्थ होती. पण शिवसेना उबाठाचा विरोध होता. ठाकरेंची शिवसेना आता सेक्युलर झालेली आहे. त्यांना काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे. पण एमआयएम सोबत आली तर आपल्या हिंदुत्त्वाला धक्का बसेल अशी भीती ठाकरेंच्या शिवसेनेला होती, असं जलील म्हणाले.
असदुद्दीन ओवैसींचा एमआयएम पक्ष यंदा महाराष्ट्रात विधानसभेच्या १६ जागा लढत आहे. एमआयएम स्वबळावर निवडणूक लढत असून पक्षानं एकूण ४ दलित उमेदवार दिले आहेत. विकास, मुस्लिमांचा राजकीय वाटा, दलित आणि वंचितांचे प्रश्न घेऊन एमआयएम निवडणूक लढत आहे. असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.
२०१९ मध्ये एमआयएमनं ४४ जागा लढवल्या होत्या. त्यातील २ जागांवर पक्षाला यश मिळालं. २०१४ मध्ये पक्षानं २२ जागा लढवत ४ जागा खिशात घातल्या होत्या. २०१९ मध्ये पक्षानं जिंकलेल्या २ जागांसह आणखी १४ जागांवर यंदा उमेदवार देण्यात आलेले आहेत. या जागा २०१९ मध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षानं जिंकल्या होत्या.