तिरंगी लढतीमुळे इंदापुरात चुरस वाढली, फाटाफुटीचा फायदा कोणाला? सर्वच उमेदवारांना विजयाची धास्ती

Indapur Vidhan Sabha Politics : इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. ऐन निवडणूकीच्या धामधुमीत झालेल्या फाटाफुटीचा कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार यावर चर्चा रंगत आहेत.

Lipi

दीपक पडकर, बारामती : बारामतीच्या बांधावर असलेल्या इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या फाटाफुटीचा कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार यावर चर्चा रंगत आहेत. खुद्द उमेदवारांनाही आता मतदार काय करतील याची धास्ती लागली आहे.

राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत येथे होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. त्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करत तिकिटही मिळविले. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे निवडणूक लढवणार हे आधीच स्पष्ट झाले होते. परंतु पाटील यांचा पक्षप्रवेश आणि त्यानंतर त्यांची जाहीर झालेली उमेदवारी शरद पवार गटाला हादरे देणारा ठरला. पाटील यांना उमेदवारी देताच लोकसभेवेळी सुप्रिया सुळे यांना मदत करणारे आप्पासाहेब जगदाळे नाराज झाले. त्यांनी वेळ न दवडता अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दुसरीकडे सोनाईचे संचालक प्रवीण माने हे ही स्वत:च्या अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिले. माने हे लोकसभेवेळी अजित पवार यांच्यासोबत होते. लोकसभेनंतर आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी ते शरदचंद्र पवार गटात गेले होते. परंतु उमेदवारी पाटील यांच्याकडे गेल्याने तेही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले.

इथपर्यंत सगळे ठीकठाक चालले आहे असे दिसत असतानाच सोनाईचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांना जोरदार धक्का दिला. त्यांचे बंधू मयुरसिंह यांनी प्रवीण माने यांना पाठींबा देत त्यांचा प्रचार सुरु केला. हर्षवर्धन पाटील यांनी यावर माझे घर फोडले गेले. मला इंदापूरात एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला.

इंदापूरातील गेल्या तीन विधानसभा निवडणूकांचा विचार केला तर भरणे विरुद्ध पाटील अशीच लढाई झाल्याचे दिसून येते. २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणूकीवेळी विजयी उमेदवार काठावरच्या मताधिक्यानेच विजयी झाला होता. २००९ला पाटील तर तद्नंतर दोनदा भरणे यांनी बाजी मारली. परंतु मतांमधील फारसे अंतर राहिले नव्हते. आता पाटील यांच्यासोबत असलेले आप्पासाहेब जगदाळे भरणेंसोबत आहेत. मयुरसिंह पाटील मानेंसोबत आहेत. तर भरणे यांच्यासोबत माने यांची ताकद यापूर्वी होती, ती आता उरलेली नाही. अशी सगळी त्रांगडी स्थिती इंदापुरात निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणूकीचा विचार करता भरणे, पाटील, माने हे सुळे यांच्यासोबत नव्हते. पाटील यांनी आता पक्षात आल्यावर आम्ही अदृश्य काम केल्याचे सांगितले असले तरी ते त्यावेळी भाजपात होते. त्यांनी अदृश्य काम केले हे मान्य केले तरी विद्यमान आमदार भरणे आणि सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने हे त्यावेळी सुळेंच्या विरोधातच होते. आता शरद पवार गटाकडे हर्षवर्धन पाटील वगळता अन्य महत्त्वाचे नेते नाहीत. इतरांचीही राजकीय ताकदीचा विचार करता तीच गत आहे. परंतु लोकसभेला इंदापूरने सुळे यांना मताधिक्य दिले होते, ही बाबही विसरता येण्यासारखी नाही. इंदापूरात प्रचारात भरणे यांनी केलेले साडीवाटप, हर्षवर्धन यांनी पाणी मिळण्यास केलेला विरोध असे स्थानिक मुद्देच अधिक गाजत आहेत. हर्षवर्धन यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. परंतु साडी वाटपाचा मुद्दा भरणे यांच्यासाठी अडचणीचा ठरतो आहे. एकूणच सगळी स्थिती याचा पाय त्याच्या पायात अशी आहे. त्यात आता सामान्य मतदार कोणाला साथ देतो, हे येत्या निवडणूकीतच कळेल.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Dattatray Bharneharshvardhan patilindapur Vidhan Sabhamh vidhan sabha nivadnukncp sharad pawarइंदापूर विधानसभा मतदारसंघदत्तात्रय भरणेंची ताकदविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीशरद पवारांची राष्ट्रवादीहर्षवर्धन पाटील यांच्याशी लढत
Comments (0)
Add Comment