Kishor Jorgewar at Chandrapur Campaign Rally: तुम्ही घरच्या माणसाला बाहेर काढलं आणि म्हणाले दुसऱ्याचा घरी जायचं नाही, मग त्याने जायचं तरी कुठं? हे शब्द आहेत चंद्रपुरातील महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांचे.
जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर मतदारसंघात फडणवीस व गडकरी यांनी शामकुळे यांना उमेदवारी दिली होती. शामकुळे बाहेरचे होते त्यांना जिल्ह्यात कुणी ओळखत नव्हतं . अवघ्या १३ दिवसांत आम्ही केलेल्या प्रचारामुळे ते विजयी झाले. या विजयाचे बक्षीस म्हणून मुनगंटीवारांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर हंसराज अहिर केंद्रीय राज्यमंत्री करण्यात आले. मात्र यावेळी मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी पक्षाने तिकीट देण्याची तयारीही दाखविली होती. मात्र मला विरोध झाला, अशी खंत जोरगेवार यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् लाडक्या बहिणींना २१००
महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात केली आहे. दरम्यान किशोर जोरगेवार हे २०१९च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेत उमेदवारी मिळवली. या सभेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार फग्गनसिंग कुलेस्ती यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस सत्तेत आली तर ही योजना बंद करेल, असा निशाणा त्यांनी साधला. शिवाय महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली.
मुनगंटीवार प्रचारात व्यस्त
किशोर जोरगेवार यांना भाजप प्रवेश नको, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी ताकद लावली होती, मात्र मुनगंटीवारांची ताकद कमी पडली. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेश झाला तेही सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते. मुनगंटीवार यांच्यावर ही मोठी नामुष्की ओढावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी देवेंद्र फडवणीस एक आहेत. असा मोठा नेता चंद्रपुरात आलेला असताना मुनगंटीवार मात्र त्यांच्या मतदारसंघात प्रचार करण्यात व्यस्त होते. मात्र फडणवीस यांची सभा जोरगेवार म्हणजेच भाजपचा उमेदवाराची होती. मुनगंटीवार चंद्रपुरातील भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनी या सभेला दांडी मारल्याने मुनगंटीवार- जोरगेवार यांच्यातील दरी अद्याप तरी मिटली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.