विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पुण्यातील शिरुरमध्ये आमदार पुत्राचं अपहरण करुन त्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला विवस्त्र करण्यात आलं.
सरोदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अपहरण झालेल्या ऋषीराज पवारचा व्हिडीओ दाखवला. ऋषीराजनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून कथन केला. ‘आमच्यासोबत प्रचारात फिरणाऱ्या भाऊ कोळपे नावाच्या तरुणानं काही जणांनी मीटिंग करायचं असल्याचं सांगितलं. तो दिवसभर आमच्यासोबत प्रचारात होता. हा खेडेगावातील मुलगा असं काही करेल याची शंकाही आली नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो. त्यानंतर माझ्या चालकानं कार मांडवगण वडगाव रोडला नेली,’ असा घटनाक्रम ऋषीराजनं कथन केला.
‘इथून पुढे कार जाणार नाही, आपण दुचाकीनं जाऊ, असं कोळपेनं सांगितलं. तिथे आधीपासूनच दोन दुचाकी उभ्या होत्या. त्यानंतर मी त्यांच्या बाईकवर बसलो. त्यांनी मला एका बंगल्यापर्यंत नेलं. मला एका रुममध्ये बोलावलं. तिथे तीन जण रुममध्ये शिरले. त्यांनी रुमचं दार बंद केलं. माझे हातपाय पकडले. एकानं माझ्या शर्टची बटणं उघडली. त्याला मी विरोध केला,’ अशी आपबिती ऋषीराजनं सांगितली.
‘तुम्ही हे का करताय? पैसेच हवे असतील तर आपण हा विषय सोडवू, असं मी त्या तरुणांना म्हटलं. त्यानंतर त्यांनी माझ्या तोंडावर एक कापड टाकलं. माझा गळा दाबला. मग त्यांनी पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला तुझा व्हिडीओ पाहिजे असं सांगितलं. या व्हिडीओसाठी आम्हाला १० कोटी रुपयांची ऑफर असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिवाची भीती असल्यानं मी घाबरुन ते सांगतील ते करण्यास तयार झालो,’ असं ऋषीराजनं पुढे सांगितलं.
‘मग त्यांनी माझे कपडे काढले. चौथ्या व्यक्तीनं एका महिलेला खोलीत आणलं. भाऊ कोळपेनं तिघांना रुमच्या बाहेर काढलं. त्यानंतर त्यानं महिलेसोबत माझा बनावट व्हिडीओ काढला. तो त्या महिलेला सूचना देत होता. त्याच्या सूचनादेखील व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. मग त्यानं त्या महिलेला कुठे पाठवलं त्याची मला कल्पना नाही. जीवाला धोका असल्यानं मी त्याच्याशी गोड बोलू लागलो. त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला,’ असं ऋषीराजनं सांगितलं.
ऋषीराज पवारसोबत पुढे घडलेला प्रकार ऍड. असीम सरोदेंनी कथन केला. ‘अपहरणकर्त्यांनी केलेली पैशांची मागणी ऐकून ऋषीराज हकबून गेला. पण त्यानं प्रसंगावधान राखलं. माझ्याकडे आत्ता इतके पैसे नाहीत. माझ्या सोबत प्रचाराला असलेल्या लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून काही पैसे देऊ शकतो, असं ऋषीराजनं त्यांना सांगितलं. त्यावर तुझा व्हिडीओ आमच्याकडे आहे. पैसे दिले नाहीस तर तो व्हायरल करु, अशी धमकी आरोपींनी ऋषीराजला दिली,’ असं सरोदेंनी सांगितलं.