Uddhav Thackeray at Parbhani Highlights from Vidhan Sabha Election: मोदी शहा महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत, तिकडे मणिपूरमध्ये एका महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले आहे. ज्या महिलेचा जीव गेला, ती महिला तुमची लाडकी बहीण नाहीये का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आज परभणीच्या महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, महाविकास आघाडीचे परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्री हे देशाचे असतात कोणत्या एका पक्षाचे नसतात. त्यांनी देशाचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असते. एकीकडे चीन भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे एका राज्याच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात मग्न आहेत. जर तुम्हाला प्रचारच करायचा असेल तर तुम्ही तुमचे पद सोडा आणि पक्षाचे स्टार प्रचारक व्हा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे जर सरकार आले नाही तर महाराष्ट्राचे काही खरे नाही. आपण पाहिलं की, या महायुतीच्या काळात मुंबई आणि मुंबई परिसरातील बहुतांश जमिनी अदानीला दान करण्यात आल्या. संपूर्ण मुंबईच अदानीच्या घशात घालण्याचा डाव या महायुती सरकारचा आहे. पण मी आपल्याला ग्वाही देतो की महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अदानीला दिलेल्या सर्व जमिनी आणि सुविधा परत घेतल्या जातील आणि त्या जमिनीवर सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधून दिली जातील, असे आश्वासनही ठाकरेंनी दिले.
मणिपूरमध्ये महिलेला जाळण्यात आले, ती तुमची लाडकी बहीण नव्हती का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खडा सवाल
यासोबतच उद्धव ठाकरेंनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा आता संकरित पक्ष झाला आहे, या पक्षात सर्वच पक्ष समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे भाजपचे काही जुनेजाणते नेते मंडळी मला संपर्क करत आहेत आणि सांगत आहेत की, मोदी आणि शहा यांनी भाजपा पक्ष संपवून टाकला आहे.
‘मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पण आम्ही कधीच त्याची जाहिरातबाजी केली नाही. या सरकारने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला योजनेची प्रसिद्धी मात्र मोठ्या प्रमाणात केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणीप्रमाणे बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिना मानधन दिले जाणार तसेच मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार’ अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ठाकरेंनी नमूद केले. तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.