Pune News: पुणे विमानतळावरून हिंजवडीला जाण्यासाठी एका प्रवाशाला एअरोमॉलमधील कॅबचालकाने साडेअकराशे रुपये आकारल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज सुमारे २०० विमानांची ये-जा सुरू असते. या माध्यमातून ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. विमानतळावरून सर्वाधिक विमाने रात्रीच्या वेळी उड्डाण करतात. त्यामुळे रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. शहरात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ‘एअरोमॉल’ येथूनच कॅब पकडावी लागते. रात्री आणि पहाटे कॅबची उपलब्धता कमी असते. त्यामुळे बऱ्याचदा कॅब उपलब्ध नसल्याचा मेसेज प्रवाशांना येतो. कॅबची मागणी वाढल्याचे दाखवून जादा दर आकारले जातात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुणे विमानतळावर शुक्रवारी पहाटे उतरलेल्या प्रवाशाला हिंजवडीला जायचे होते. सुरुवातीला छोट्या कॅबचे बुकिंग केले असता, ५८९ रुपये भाडे दाखविण्यात आले.
प्रवाशाने कॅब बुक केल्यावर एका मिनिटात ती ‘एअरोमॉल’ च्या दुसऱ्या मजल्यावर येईल, असा मेसेज आला. मात्र, काही वेळातच चालकाने बुकिंग रद्द केले. त्यानंतर प्रवाशाने पुन्हा कॅब बुकिंगचा प्रयत्न केला. त्या वेळी मिनी कॅबसाठी ११४१ रुपये आणि ‘एसयूव्ही’ साठी १८०० रुपये भाडे दाखविण्यात आले. याबाबत प्रवाशाने थेट सोशल मीडियावर गाऱ्हाणे मांडले. या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने ‘एअरोमॉल’ वरून सेवा देणाऱ्या कॅबचालकांच्या मनमानीला आळा घालणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवल्या.
‘विमानतळ प्रशासनाने लक्ष द्यावे’
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना शहरात येण्यासाठी ‘एअरोमॉल’ शिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. मात्र, येथून कॅब बुक करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कधीही कॅब वेळेवर येत नाहीत. बऱ्याचदा ‘एअरोमॉल’ मध्येच कोंडी होऊन बाहेर पडण्यास उशीर होतो. भरीस भर म्हणून आता कॅबचालकांनी प्रवाशांची लूटमार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘एअरोमॉल’ प्रशासन नेमके करते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती प्रवाशांनी केली आहे.