Sinhagad Fort Pune: प्रकल्पाच्या नियोजनानुसार सहा मिनिटांत कठेपठार डोंगरावर पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात एखाद्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ‘रोप-वे’चा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच पुणेकरांना सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दिमाखात उभ्या असलेल्या सिंहगडावर ‘रोप-वे’ने जाण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून गडावर जाण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ लागणार असून, घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून पर्यटकांची सुटकाही होणार आहे. सिंहगडावर पर्यटकांचा वाढता राबता आणि गडावर जाण्याच्या घाट रस्त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी ‘रोप-वे’ करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला होता.
‘शिवाई कृष्णा रोप-वे’ या एजन्सीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, प्रशासकीय निकषांची पूर्तता, करोना आणि प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या आतकरवाडीला गावठाणाचा दर्जा नसल्याने प्रकल्प लांबला. महसूल विभागाने प्रकल्पाबाबत पुढाकार घेऊन सरकारला प्रस्ताव पाठवून मान्यतेसाठी प्रयत्न केले. एजन्सीला ‘रोप-वे’साठी गेल्या वर्षी वन विभागासह ‘पीएमआरडीए’ने जूनमध्ये मंजुरी दिली. पावसाळ्यामुळे कामाला सुरुवात झाली नव्हती. आता काम सुरू झाले आहे.
जेजुरी ‘रोप-वे’चे काम संथगतीने
महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या खंडोबाचे मूळस्थान जेजुरीच्या कठेपठार मंदिरामध्ये जाण्यासाठीही ‘रोप-वे’साठी मान्यता मिळाली आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही प्रस्तावातील तांत्रिक कामांची पूर्तता अजूनही झालेली नाही. प्रकल्पाच्या नियोजनानुसार सहा मिनिटांत कठेपठार डोंगरावर पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात एखाद्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ‘रोप-वे’चा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
सिंहगड रोप-वेसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता जूनच्या अखेरीस मिळाल्या. आराखड्यामध्ये अन्य काही बदलही करण्यात आले. सिंहगड परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आम्ही लगेच कामाला सुरुवात केली नाही. आता पाऊस थांबल्याने आम्ही प्राथमिक कामे हीती घेतली आहेत. रोप-वे मार्गावरील मातीची गुणवत्ता तपासणी आणि तांत्रिक कामे सुरू आहेत. -उदयराज शिंदे, संचालक, अध्यक्ष, ‘शिवाई कृष्णा रोप-वे एजन्सी
असा असेल ‘रोप-वे’…
■आतकरवाडी येथे ‘रोप-वे’चा पायथा.
■सिंहगडावरील दूरदर्शनच्या टॉवरशेजारी शेवटचा थांबा.
■पायथ्यापासून माथ्यापर्यंत ११०० मीटर लांबीचा ‘रोप-वे’.
■’रोप-वे ‘ने होणार १.८ किलोमीटर अंतर पार.
■ गडावर पोहोचण्यासाठी चार ते पाच मिनिटे लागणार.
■ एका तासात साधारणतः एक हजार पर्यटकांची ने-आण.
■ प्रस्तावामध्ये ३२ पाळण्यांचे (ट्रॉली) नियोजन.
रोप-वे’ कशासाठी हवा?
■ सिंहगडाच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी पूरक.
■ पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी सुमारे १५ हजार पर्यटकांची भेट.
■ ‘रोप-वे ‘मुळे गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होणार.
■ वाहनांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट.
■ पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार, उत्पन्नाचे साधन.