Rupesh Mhatre joins Shiv Sena :काहीच दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी म्हात्रे यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते.
रुपेश म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची त्यांची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अखेर ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन पक्षप्रवेश केला.
बंड शमलं तरी बाहेरचा रस्ता
महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ समाजवादी पक्षाच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र अखेरच्या दिवशी म्हात्रेंचं बंड थोपवण्यात यश आलं होतं. परंतु तरीही त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रुपेश म्हात्रे यांना ठाकरे गटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
Rupesh Mhatre : वरळी-वांद्रेत सेटिंगचा आरोप, माजी आमदाराला ठाकरेंनी बाहेर काढलं, शिंदेंनी दोन दिवसात पक्षात घेतलं
उद्धव ठाकरेंवरील टीका भोवल्याची चर्चा
अर्ज मागे घेण्याच्या काही दिवस आधी रुपेश म्हात्रे यांनी एक सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. वांद्रे पूर्व आणि वरळी विधानसभा मतदारसंघात मदत व्हावी, यासाठी भिवंडी पूर्व येथे समाजवादी पक्षाचा उमेदवार देण्यात आला. त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येक वेळी बळी देण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप रुपेश म्हात्रे यांनी केला होता, या टीकेमुळेच त्यांच्यावर कारवाई झाल्याचं बोललं जातं. कारण वरळीतून आदित्य ठाकरे, तर मातोश्रीचे अंगण वांद्रे पूर्व येथून आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई रिंगणात आहेत.