Santosh Bangar Wife Video Viral: राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. त्याआधी मात्र राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हायलाइट्स:
- नाही देणार आम्ही मत…चला जा..!
- संतोष बांगरांच्या पत्नीला नागरिकाचं सडेतोड उत्तर
- विधानसभा निवडणूक २०२४
नेमकं काय घडलं?
राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. त्याआधी मात्र राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मतदान मागण्यासाठी गेलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीला मतदारांनी हाकलून लावलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बांगर यांच्या पत्नी एका घरी जातात आणि तिथल्या नागरिकांना सांगतात की, ”२० तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे”, तेवढ्यात तिथे उपस्थित असलेला एक व्यक्ती म्हणतो ”नाही…नाही…नाही देणार आम्ही मत” असं म्हणताना दिसत आहे. तेवढ्यात प्रचाराला आलेल्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
पैसे लागतील ते फोन पे करा
दरम्यान, आमदार बांगर यांनी मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत येण्यासाठी फोन पे करा, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
संतोष बांगर यांनी कळमनुरी येथे तोष्णीवाल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु आचारसंहिता लागून असताना त्यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने ते चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, ”माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करावे, यासाठी मिळेल तेवढ्या गाड्या आणाव्यात. यासाठी बाहेर मतदारसंघातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांचीही लिस्ट बनवावी, कार्यकर्त्यांना लागणाऱ्या ज्या गाड्या असतील त्या गाड्यांसाठी जे पैसे लागतील ते फोन पे करा, त्यांना सांग येण्याजाण्याची काळजी असेल तर त्याचीही व्यवस्था आम्ही करू”, असं संतोष बांगर म्हणाले होते