Amit Shah on Devendra Fadnavis : अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे संकेत दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या गोटात खळबळ माजू शकते.
अमित शहा काय म्हणाले?
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दिवशी आपल्याला निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, असे अमित शहा म्हणाले.
अजितदादा काय म्हणाले?
महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय अद्याप झाला नसताना अमित शहा यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे संकेत दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अमितभाईंना भाषणात तसे बोलण्याचा अधिकार आहे, असे अजितदादा म्हणाले. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा विषय ठरवला जाईल, असे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले.
ठाकरेंवर शहांचा निशाणा
मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले होते; परंतु शिवसेनेने जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या नेत्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार जाऊन बसले, अशा शब्दात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शरद पवारांवर टीका
‘शरद पवार या वयातही खोटं बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचं ते सांगतात. वास्तविक देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. महायुतीच्या काळात समृद्धी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरुणांसाठी योजना राबवण्यात आल्या. त्यासारखे महाविकास आघाडीच्या काळातील एखादे काम शरद पवारांनी सांगावे, असे थेट आव्हानच अमित शहा यांनी शरद पवार यांना दिले.