Amit Shah: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आज माध्यमांकडून विचारण्यात आला.
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करु, असं सूचक विधान अमित शहांनी केलं. काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलतानाही शहांनी असंच सूचक विधान केलं होतं. ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचं सरकार आणायचं आणि फडणवीस यांना विजयी करायचं, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे’, असं शहा म्हणाले होते.
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर अमित शहांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यंदा आम्ही शरद पवारांना मुख्यमंत्री निवडण्याची संधी देणार नाही. पवारांना खोट्या कहाण्या रचण्याची सवय झाली आहे. पण यंदा त्यांच्या कहाण्या यशस्वी होणार नाहीत, अशी टीका शहांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य करत आव्हान दिलं. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी वीर सावरकर यांच्यासाठी दोन बरे शब्द बोलू शकतात का, असं मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो,’ अशा शब्दांत शहांनी ठाकरेंवर तोफ डागली.
भाजपच्या संकल्पपत्रात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आहे. यासोबत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यात २५ लाख नव्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिले जाणारे १५०० रुपये २१०० रुपये करण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला २ कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.