Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत माहीमच्या जागेवरुन बरंच राजकारण रंगलं. यामुळे शिंदेसेना आणि मनसेचे संबंध काही प्रमाणात ताणले गेले. पण आता त्यात सुधारणा होताना दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेला छुपा पाठिंबा दिला आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या मतदारसंघात मनसेनं उमेदवार दिलेला नाही. पण त्यांनी शिवसेना उबाठाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्याविरोधात प्रचार सुरु केलेला आहे. मनसेचे पदाधिकारी शिंदेसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. मनसेचा फायदा जाधव यांना होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा यामिनी जाधव यांनी लढवली होती. त्या शिंदेसेनेच्या उमेदवार होत्या. शिवसेना उबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ मतांनी पराभव केला. या पराभवात भायखळ्यात सावंत यांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली. जाधव भायखळ्यात तब्बल ४६ हजार मतांनी पिछाडीवर होत्या. विशेष म्हणजे जाधव स्वत: भायखळ्याच्या आमदार आहे. पण आपल्याच मतदारसंघात त्या पिछाडीवर पडल्या.
भायखळ्यात मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ठाकरेसेनेच्या जामसुतकर यांचं पारडं जड मानलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव मतांच्या विभाजनामुळे निवडून आल्या. एमआयएमचे वारिस पठाण आणि काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्यात झालेल्या मत विभाजनाचा फायदा जाधव यांना झाला होता.
Maharashtra Election: माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?
२०१९ मध्ये विधानसभेला ५१ हजार १८० मतं घेणाऱ्या जाधव यांना नुकत्याच झालेल्या लोकसभेत भायखळ्यातून ४० हजार ८१७ मतदान झालं आहे. तर याच मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरेसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी तब्बल ८६ हजार ८८३ मतं घेतली. त्यामुळे आता जाधव यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. मनसेचा छुपा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे. तो किती उपयोगी ठरणार याचं उत्तर २३ नोव्हेंबरला मिळेल.